बाजारसावंगी : शेतातील जुनाट चारा जाळून आमचे नुकसान का केले, या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना खुलताबाद तालुक्यातील लोणी येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटाने दिलेल्या परस्पराविरोधी तक्रारीवरून १५ जणाविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अनिस पटेल यांनी खुलताबाद पोलिसांकडे फिर्याद दिली की, लोणी शिवारात गट नंबर ३०९ मध्ये माझी शेतजमीन आहे. शेजारी असलेल्या दादा पटेल यांच्या शेतातील चारा व इतर वस्तू मुख्तार पटेल यांने पेटवून दिल्या. त्यामुळे माझ्या शेतातील गहू, मकाची कणसे व भुसा आदी वस्तू जळून खाक झाल्या. यात माझे सुमारे बावीस हजारांचे नुकसान केले. यासंदर्भात मी विचारणा केली असता समोरील आठ ते दहा जणांनी मला लाठ्या काठ्याने मारहाण केली. तर विरोधी गटातील अबरार पटेल यांनी फिर्याद दिली की, आमच्या शेतातील चारा जाळला. यात गावात जमलेल्या जमावाने आमच्या घरावर लाठ्या काठ्याने हल्ला करीत जखमी केले, त्यांच्या फिर्यादीवरून सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय जगताप, नवनाथ कोल्हे, विनोद बिघौत, योगेश नाडे करीत आहेत.