पैठण : नेपाळ येथे झालेल्या भूकंपाची नोंद जायकवाडी येथील भूकंप मापन यंत्रावर झाली असून गेल्या २४ तासांत भूकंपाच्या दोन धक्क्यांची नोंद झाली आहे. यात एक प्रादेशिक धक्का असून दुसरा आंतरराष्ट्रीय धक्का आहे. यात प्रादेशिक धक्क्याचे केंद्र धरणापासून २५० किलोमीटर असल्याचे दगडी धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.जायकवाडीच्या भूकंप मापन यंत्रावर शनिवारी पहाटे ३.४५ वा प्रादेशिक धक्क्यांची नोंद झाली असून ३.३ रिस्टर स्केल एवढी तीव्रता दाखविण्यात आली आहे, तर भूकंपाचे केंद्र जायकवाडी धरणापासून २५० किलोमीटर अंतरावर असल्याचे दिसून आले आहे. दुपारी १२ वाजेदरम्यान नेपाळ येथे झालेल्या भूकंपाची नोंद झाली असून हा धक्का ५ रिश्टर स्केल एवढा आहे, तर भूकंप मापन यंत्रानुसार या भूकंपाचे केंद्र १००० किलोमीटर अंतरावर आहे. जायकवाडी येथील भूकंप मापन यंत्रावर जगभरात झालेल्या भूकंपाची नोंद होते. या भूकंप मापन यंत्रापासून १० हजार किलोमीटर हवाई अंतरात भूगर्भात हालचाल झाल्यास तशी नोंद भूकंप मापन यंत्रावर होते. प्रादेशिक धक्का हा कमी क्षमतेचा असल्याने याची जाणीव झाली नाही, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.
जायकवाडीत २४ तासांत दोन भूकंप धक्क्यांची नोंद
By admin | Updated: April 26, 2015 01:02 IST