छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच औरंगाबाद पोलिस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यशाची नोंद करत तब्बल ३६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांवर गुण मिळवून पोलिसपुत्रांच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे, शाळेतील सत्यम् पाटील व शिवम् पाटील या जुळ्या भावांनी अनुक्रमे ९९.४० व ९९.६० टक्के गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले.
औरंगाबाद पोलिस स्कूलच्या १२२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी तब्बल ३६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांवर गुण मिळवले आहेत. याशिवाय ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४३ असून, २७ विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. पोलिस स्कूलमध्ये बहुतांश पोलिस अधिकारी व अंमलदारांची मुले शिक्षण घेतात. शाळेच्या शिस्तप्रिय आणि अभ्यासकेंद्रित वातावरणामुळे पाल्यांना यश मिळाल्याची भावना पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
९५ टक्क्यांवरील गुणवंतरिद्धी सचिन वाघ (९९.४%), सुमित संजय साळुंके (९६.२%), हर्षदा नवनाथ कोल्हे (९६%), शर्वरी महेंद्र खंडारे (९५.८%) व हर्षा राजेंद्र पदमे (९५.२%).
जुळ्या भावांना सारखेच गुणयाच शाळेतील सत्यम् पाटील व शिवम् पाटील या जुळ्या भावांना अनुक्रमे ९९.४० व ९९.६० टक्के गुण मिळाले आहेत. सत्यम, शिवमचे वडील छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलिसांच्या वाहतूक शाखेत हेडकॉन्स्टेबल आहेत. पोलिस विभागात असूनही त्यांनी मुलांकडे लक्ष देऊन ‘सेल्फ स्टडी’वर भर दिला होता. या दोघांसह शाळेतील सर्व गुणवंतांचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, शीलवंत नांदेडकर, संचालक रंजीत दास यांनी मुख्याध्यापिका गीता दामोदरन, प्रशासक किरण चव्हाण यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.