गंगापूर (जि. औरंगाबाद) : थंडीच्या दिवसांत खवय्यांचा हुरड्याकडे कल वाढतो. औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला परिसरातील शेतकऱ्यांनी या पारंपरिक उत्पादनात व्यवसायाची संधी शोधली आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या तिमाहीत या परिसरातील हुरड्याची एकूण उलाढाल अंदाजे पन्नास लाखांच्या घरात राहत आहे.
दहेगाव बंगला, मुरमी, नरसापूर, गुरू धानोरा, माळवाडी, ढोरेगाव व पदमपूर परिसरातील सुपीक जमिनीतील गोड हुरड्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हुरड्याकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची व्यापक दृष्टी आल्यामुळे काही वर्षांपासून हुरडा स्थानिक बाजारपेठे ओलांडून परराज्यांतही पोहोचत आहे. हुरड्याची राजहंस, दूधमोगरा, शाळू, गूळभेंडी व सुरती हुरडा अशी वर्गवारी केली जाते. यंदा थंडी कमी असल्याने सुरती हुरड्याचा सध्याचा बाजारभाव अंदाजे १३० रुपये किलो आहे. या महामार्गावर दहेगाव बंगला ते गंगापूर फाट्याच्या दुतर्फा शेतकरी हुरडा विकताना दिसतात.
नरसापूरचे शेतकरी अण्णासाहेब शिंदे यांनी हुरडा व्यवसायामध्ये मोठी भरारी घेतल्याचे दिसते. शिंदे हे रोज आठशे किलोंपर्यंत हुरडा राज्याच्या विविध भागांत पोहोचवितात. यासाठी ते स्थानिक शेतकऱ्यांकडूनही हुरडा खरेदी करतात.
पदमपूर येथील राहुल जाधव यांनी हुरड्यासाठी शेतकऱ्यांचे गट विकसित केले असून औरंगाबाद शहरासह पुण्यालाही ते हुरडा पाठवितात. पुण्यात त्यांच्या नातेवाइकाने ‘घरपोहोच हुरडा’ ही संकल्पना राबविली व तिला अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
शामिर शेख या शेतकऱ्याने ढोरेगाव येथे स्वतःचे ‘शिवना ॲग्रो टुरिझम’ थाटले असून, त्यांच्याकडे हुरडा पार्ट्यांचे आयोजन केले जाते.
चौकट
अनेक शेतकरी कुटुंबांना मिळाला रोजगार
ज्वारी उत्पन्नाच्या तुलनेत कमी कालावधीत अधिक नफा बळिराजाला हुरडा व्यवसायातून मिळताना दिसतो. त्यामुळे परिसरात हा व्यवसाय एका मोठ्या उद्योगाच्या रूपाने विकसित होत आहे. यामध्ये कोणीही मध्यस्थ नसून शेतकरीच विक्रेते आहेत. याद्वारे शंभरच्या आसपास शेतकरी कुटुंबांना रोजगार मिळाला आहे.
कोट........
शेतकऱ्यांनी निसर्ग व शासनावर अवलंबून न राहता शेतीपूरक जोडधंदे उभे करून उद्योजकतेच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. भविष्यात स्वतःचा ॲग्रो टुरिझम व शेतीपूरक उत्पादनाचा पॅकिंग उद्योग उभा करण्याचा माझा मानस आहे.
- अण्णासाहेब शिंदे, हुरडा उत्पादक व निर्यातदार.
कोट........
हुरडा व्यवसायामध्ये आमच्यासह स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. याच धर्तीवर भविष्यात विविध शेती उत्पादने ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ या संकल्पनेवर औद्योगिक परिसरात घरपोहोच देणार आहोत.
- शामिर शेख, हुरडा उत्पादक शेतकरी.
फाेटो आहे.