तुळजापूर : रथसप्तमीनिमित्त कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीची शुक्रवारी रथालंकार महापूजा मांडण्यात आली होती. या निमित्ताने देवीला उच्च प्रतीचे अलंकार घालण्यात आले होते. दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळच्या अभिषेक पूजेनंतर देवीला महावस्त्र अलंकार घालण्यात आल्यानंतर रथसप्तमीनिमित्त रथलंकार पूजा मांडण्यात आली. त्यानंतर पूजेचे मानकरी किशोर भैये यांनी धुपारती करून अंगारा काढला. यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा यांच्यासह सेवेकरी उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत देवीचे रथालंकार पूजेचे दर्शन खुले होते. रथसप्तमीसह गुढीपाडवा, दीपावली पाडवा, महालक्ष्मीपूजन, दसरा आदी मोजक्या दिवशीच तुळजाभवानीला विशेष अलंकार घालण्याची प्रथा आहे. रथसप्तमीदिनी देवीला उंची शालू घालण्यात येतो. मोकळे केस, एका हातात लगाम तर एका हातात चाबूक अशी रथात स्वार तुळजाभवानीचे चैतन्यदायी रूप भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. नवरात्रोत्सवानंतर केवळ रथसप्तमीलाच देवीची रथालंकार पूजा मांडण्यात येते. तत्पूर्वी पहाटे पाच वाजता चरणतीर्थ पूजा होऊन मंदिर देवीदर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी ७ वाजता अभिषेक पूजेस सुरुवात झाली. रात्री प्रक्षाळ पूजेनंतर दर्शन बंद करण्यात आले.
तुळजाभवानी मातेची विशेष पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2017 23:49 IST