ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 5 - पाचोरा येथील न्यायाधीशांच्या पत्नीची पर्स सिल्लोड बस्थानकावर अज्ञात चोरट्यानी लांबवल्याची घटना रविवारी दुपारी घडली. जळगाव बसमध्ये चढताना हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सिल्लोड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाचोरा येथे कार्यरत असलेले न्यायाधीश मोहमंद ताहेर बिलाल हे परिवार सोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत नांदेड येथे गेले होते. पाचोरा येथे परत जात असताना ते सिल्लोड बस्थानकावर थांबले होते. पहुर जाण्यासाठी ते व त्यांची पत्नी जळगाव बसमध्ये चढत असताना त्यांच्या पत्नीजवळ पिशवित ठेवलेली पर्स चोरट्यानी लांबविली.
चोरी गेलेल्या पर्स मध्ये 45 हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठन, 20 हजार रूपयांच्या सोन्याच्या बाळ्या, 15 हजारांच्या 2 अंगठ्या, चांदीची चैन, मोबाइल, रोख 700 रूपये असे 84 हजार रुपयांचा ऐवज होता.
बसमध्ये चढताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानी सिल्लोड शहर पोलीस ठाणे गाठुन तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिल्लोड बसस्थानकावरुन झालेल्या चोरीचे आतापर्यंत 8 गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहे. पण एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. आता या न्यायाधीश महोदयाच्या होममिनिस्टरचे दागिने सापडतात का? की हा गुन्हाही फाइल बंद केला जातो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
सिल्लोड बसस्थानक चोरट्याचा अड्डा
सिल्लोड बसस्थानकावर सीसीटीव्ही बसवले आहे. एक पोलीस कर्मचारी येथे तैनात केला आहे. तरी या चोरट्यांचा तपास लागत नाही. यामुळे पोलिसांच्या तपासावर नागरिकांना संशय येत आहे. सिल्लोड बसस्थानक हे जणू चोरटे अट्टल गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. या पूर्वी चॉकलेट, बिस्किटमधून गुंगीचे औषध देऊन 8 लोकांना लुटण्यात आले आहे. त्यात आतापर्यंत 5 लाखांच्या वर दागिने व रोखरक्कम चोरट्यानी लंपास केले आहे.
पाकिट मार
सिल्लोड बसस्थानकावर वयस्कर महिला पुरुष यांना गंडवणारी टोळी कार्यरत आहे. एक 2 आठवडे उलटले की अशा घटना घडतात. या शिवाय पाकिट मार बसस्थानकावर फिरतात. नागरिकांनी सिल्लोड बस स्थानकावर वावरताना सावध राहावे. कुणी संशयित दिसल्यास पोलिसांना सुचना द्याव्या, असे आव्हान पोलिसांनी केले आहे.