औरंगाबाद : आदिवासी समाजातून आलेल्या लेखकांनी आत्मभान जागविणारे विद्रोही लेखन केले. इतर मराठी साहित्यिकांनी लिहिलेले आदिवासी साहित्य मात्र केवळ आम्ही आदिवासींसाठी काय केले तेच सांगत राहिले, अशी भावना डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी व्यक्त केली. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे आयोजित ना.गो. नांदापूरकर व्याख्यानमालेत ‘आदिवासी साहित्यासमोरील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. उपाध्यक्ष दादा गोरे, कार्यवाह कुंडलिक अतकरे उपस्थित होते. डॉ. मुनघाटे म्हणाले की, आजवर अनेक बिगर आदिवासी साहित्यिकांनी आदिवासींवर लिहिले. मात्र, काही अपवाद वगळता बहुतेकांनी अंधश्रद्ध, मागासलेले, चित्रविचित्र असे आदिवासींचे चित्रण केले. महाश्वेतादेवी यांचे मराठीत अनुवादित झालेले ‘अरण्येर अधिकार’ तटस्थ व वास्तव चित्र उभे करते. वर्षानुवर्षे हे विपर्यस्त चित्रण सहन केल्यानंतर आदिवासी स्वत: लिहू लागला. छात्र युवा संघर्ष वाहिनी, युक्रांद अशा चळवळींमधून त्याच्यातला कार्यकर्ता जागा झाला. आदिवासी साहित्याला या आत्मभानामुळे नवी दिशा मिळाली. दादा गोरे यांनी सूत्रसंचालन केले.
आदिवासी लेखकांनी आत्मभान जागविणारे विद्रोही लेखन केले.
By admin | Updated: December 29, 2014 01:07 IST