लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत पाणीपुरवठा योजनेची अक्षरश: वाट लागली आहे. कोणत्याही क्षणी शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा बंद होऊ शकतो, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी ७०० आणि १२०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्यांना वेल्डिंगचे थिगळ लावून पाणीपुरवठा योजना ओढण्यात येत आहे. मागील वर्षभरात १२ वेळेस जलवाहिनी फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात फारोळा येथे १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीची मोठी डागडुजी करावी लागणार आहे.सोमवारी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी संपूर्ण पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नक्षत्रवाडी येथील डोंगरावर ३५ वर्षांपूर्वी पाणीपुरवठ्यासाठी मोठा एमबीआर बांधला होता. या पाणीपुरवठा केंद्रातून शहर आणि सिडको-हडकोला गुरुत्वाकर्षण शक्तीने पाणीपुरवठा होत होता. मागील वर्षी समांतर जलवाहिनीचे काम करणाºया कंपनीने पाणीपुरवठा केंद्राला बायपास करून शहराला थेट पाणीपुरवठा सुरू केला. सध्या लाखो रुपयांचे एमबीआर धूळखात पडले आहे. कंपनीने केलेल्या कामाचे समर्थन मनपा अधिकारी करीत आहेत. त्यामुळे शहराचा आणि सिडकोचा पाणी वाढल्याचा अजब दावाही यावेळी करण्यात आला.फारोळा जलशुद्धीकरणात विजेची यंत्रणा, ४० वर्षांपूर्वीचे पाणीपुरवठ्याचे पंप अत्यंत खिळखिळे झाले आहेत. दुरुस्तीसाठी कर्मचारी नसतानाही कसेबसे हे पंप अहोरात्र चालविण्यात येत आहेत. फारोळा केंद्रात येणाºया १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला मोठे भगदाड पडले आहे. लवकरच त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
एका वर्षात तब्बल १२ वेळेस फुटली जलवाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:56 IST