लातूर : लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य व केंद्राच्या मदतीने जलपरी लातूरकरांच्या मदतीला धावून आली. १२ एप्रिलपासून या जलपरीने लातूरकरांची तहान भागविली. आतापर्यंत २५ कोटी ४५ लाख लिटर पाणी या जलपरीने लातूरकरांना दिले आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात पाणी नसले तरी साई व नागझरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे लातूर मनपाने या प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी, जलपरीची सेवा मंगळवारपासून बंद होत आहे.लातूर शहरामध्ये गेल्या साडेसहा महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई होती. पंधरा दिवसांपूर्वी लातूर शहरात मोठा पाऊस झाला आणि जिल्ह्यातील बंधारे व मध्यम प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी साठले आहे. साई व नागझरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. या दोन्ही प्रकल्पांतून लातूर शहरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात नळाद्वारेही पाणीपुरवठा करण्यात आला आहे. चांगल्या प्रमाणात पाणी साठवणूक झाल्यामुळे मनपाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रेल्वे प्रशासनाला २ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून जलपरीची सेवा बंद करण्यास काही हरकत नाही, असे कळविले आहे. त्यानुसार सोमवारी शेवटची ट्रीप जलपरी करणार आहे. आतापर्यंत या जलपरीने ११० फेऱ्या केल्या आहेत. १० वॅगनच्या नऊ आणि ५० वॅगनच्या १०० अशा एकूण ११० फेऱ्या झाल्या आहेत. सोमवारी होत असलेली १११ वी फेरी होणार आहे. १० वॅगनच्या नऊ फेऱ्यांद्वारे प्रत्येकी ५ लाख लिटर पाणी आणण्यात आले. तर ५० वॅगनच्या जलपरीने प्रत्येकी २५ लाख लिटर पाणी आणले आहे. २ कोटी ४५ लाख लिटर पाणी आणून या जलपरीने लातूरकरांची तहान भागविली आहे. सोमवारी होत असलेली १११ वी फेरी आहे. या १११ फेऱ्यांद्वारे २५ कोटी ७० लाख लिटर पाणी लातूरकरांना या जलपरीने दिले आहे. त्यामुळे सोमवारी जलपरीला मोठ्या उत्साहात निरोप दिला जाणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘जलपरी’ घेणार उद्या लातूरकरांचा निरोप
By admin | Updated: August 8, 2016 00:41 IST