औरंगाबाद : भगवान गडावर दसरा मेळावा घेऊन तेथे भाषण करण्याचा चंग ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बांधला आहे, तर गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राजकीय भाषण गडावर होऊ न देण्याचा निर्धार केला आहे. या सगळ्या प्रकरणामुळे समाज दिशाहीन होत असून, दसरा मेळावा शांततेत व्हावा, अशी प्रत्येक समाजबांधवाची भावना असल्याचे मत जय भगवान महासंघातर्फे पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले. ग्रामविकासमंत्री मुंडे आणि महंत शास्त्री यांनी एकत्र बसून त्यांच्यातील अंतर्गत वाद मिटवावा. त्या दोघांनाही सद्बुद्धी यावी. समाजात संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये. यासाठी त्या उभयंतांनी एकत्रितपणे चर्चा करावी, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मोठे योगदान दिले आहे. साहेबानंतर समाज दिशाहीन झालेला आहे. भगवानगड हे समाजबांधवांचे प्रेरणास्थान आहे. पंकजा मुंडे आणि महंत शास्त्री यांच्यात जो काही वाद असेल, तो त्यांनी एकत्र येऊन मिटवावा. भगवान गडाचे महत्त्व व श्रद्धा अबाधित ठेवण्याचे आवाहन महासंघाने केले आहे. प.पू.भगवानबाबांच्या विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्या समाज बांधवांनी दसरा मेळावा शांततेत पार पाडावा, असेही आवाहन यावेळी सानप यांच्यासह राम दहीफळे, सचिन डोईफोडे, विशाल सानप, योगेश फुंंदे यांनी केले आहे.
भगवानगडप्रकरणी दोघांनी एकत्र यावे
By admin | Updated: October 10, 2016 01:11 IST