किनवट : तालुक्यातील किनवटसह बोधडी, इस्लापूर जि़ प़ हायस्कूलच्या शिक्षकांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगारच झाला नसल्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ एक-दोन दिवसांत पगार न झाल्यास या शाळांचे शिक्षक सामुहिक रजेवर जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे त्यांच्या हालचालीवरून दिसून येत आहे़जिल्ह्यापासून दीडशे कि़ मी़ अंतरावरील किनवट या आदिवासी तालुक्यातील किनवट, बोधडी या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या शिक्षकांचे एप्रिल, मे, जून तर इस्लापूर हायस्कूलच्या शिक्षकांचे एप्रिल व मे या महिन्याचा पगारच झाला नाही़ तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने घरखर्च चालवणे कठीण बनले आहे़ बँक कर्ज असल्याने खातेबंदच्या नोटीसा शिक्षकांना मिळाल्या आहेत़ लगीनसराई गेली, पगारच नसल्याने नातेवाईक व मित्र आप्तेष्टांच्या लग्नाला आहेर घेवून जाता आले नाही़ आर्थिक संकटात वेतनाअभावी किनवट तालुक्यातील जि़प़च्या माध्यमिक शाळांचे शिक्षक सापडले आहेत़पगारच नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शिक्षकांना उसणवारी मिळणे कठीण बनले़ परिणामी विद्यार्जन करण्यात मन लागत नसल्याचे काही शिक्षकांनी बोलून दाखविले़ वेतन वेळीच न झाल्यास शिक्षक सामुहिक रजेवर जाण्याच्या मानसिकतेत असल्याचे काही शिक्षकांनी बोलून दाखविले़ याविषयी नांदेड जि़प़च्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता कोषागार विभागात बिले दाखल झाली असून दोन-तीन दिवसांत थकलेले वेतन शिक्षकांच्या हातात पडेल असे सूत्रांनी माहिती देताना सांगितले़ (वार्ताहर)
तीन महिन्यांपासून शिक्षकांचे पगार थकित
By admin | Updated: July 10, 2014 00:44 IST