उस्मानाबाद : अपंग नसलेले अनेक जण अपंगत्वाचा बोगस दाखला खिशात बाळगून राजरोसपणे शासकीय योजनांवर डल्ला मारत असल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात उघड झाल्या आहेत. मात्र जन्मजात अपंगत्व असलेल्या एका चिमुरडीला तब्बल तीन वर्षापासून जिल्हा रुग्णालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. मात्र त्यानंतरही ढिम्म असलेल्या आरोग्य प्रशासनाला जाग येत नसल्याचे केविलवाणे चित्र बुधवारी दिसून आले. अपंगांची तपासणी तसेच त्यांना नियमानुसार प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक बुधवारी जिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी असते. मात्र जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांना अनेकवेळा येथील ढिसाळ कारभाराचा फटका सोसावा लागतो. कधी तपासणीसाठी डॉक्टर नाहीत तर कधी इतर कर्मचारी जागेवर राहत नसल्याचा आरोप होत असतो. याबरोबरच चिरीमिरी दिल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जात नाही, असा दबका सूरही या नागरिकांतून नेहमीच उमटत असतो. आठ वर्षाच्या ऋतुजा पाटीलची कहाणी ऐकल्यानंतर नागरिकांच्या या आरोपालाही जणूकाही पुष्ठीच मिळते. तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी येथील ऋतुजा यशवंत पाटील मागील तीन वर्षापासून आपल्या आजोबासोबत अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी आरोग्य प्रशासनाच्या दरबारी हेलपाटे मारते आहे. पोरीला जन्मजात अपंगत्व आहे मात्र कधी कागदपत्र पूर्ण नाहीत म्हणून तर कधी डॉक्टर उपलब्ध नाही म्हणून माघारी पाठविले जात असल्याची व्यथा या मुलीचे ६७ वर्षीय आजोबा बाळासाहेब देवराव पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. दोन वर्षापूर्वी तुळजापूर रुग्णालयात संपूर्ण कागदपत्रे दिली. त्यानंतर संबंधितांकडे गेल्यानंतर ती गहाळ झाल्याचे सांगितले गेले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील संबंधित विभागात संबंधित कागदपत्रांची पूर्तता केली. ती कागदपत्रेही मिळत नसल्याचे तेथील कर्मचारी सांगतात. बुधवारी १० डिसेंबर रोजी चिमुकली ऋतुजा पुन्हा आपल्या आजोबासोबत जिल्हा रुग्णालयात आली होती. यावेळी येताना कागदपत्रांचा नवा संच त्यांनी सोबत आणला होता. पूर्वी दिलेली कागदपत्रे रुग्णालयाकडे नाहीत म्हटल्यानंतर या आजोबांनी नव्याने कागदपत्रे दिली मात्र त्याची पोहच देण्यासही संबंधित कर्मचाऱ्याने नकार दिला. आम्हाला पोहोच देता येत नाही, असे सांगत, नेहमीप्रमाणे पुढच्या बुधवारी या..असा सल्ला या कर्मचाऱ्याने दिला. आणि त्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी थेट ‘लोकमत’ कार्यालय गाठून त्यांची ही व्यथा मांडली. मागील तीन वर्षापासून अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी झगडणाऱ्या ऋतुजाला जिल्हा आरोग्य विभाग आतातरी प्रमाणपत्र देणार का? की आणखी काही वर्ष त्यासाठी तिला तिच्या आजोबासह रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागणार? असा प्रश्न उभा टाकला आहे. (जि.प्र.)४चिमुकली ऋतुजा आपल्या आजोबासह बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयात आली. तिची व्यथा ऐकल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जयपाल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आॅनलाईन प्रणाली आहे. कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर सॉफ्टवेअरद्वारे अपंगत्वाची टक्केवारी मिळते. त्यानुसार संबंधितांना प्रमाणपत्र दिले जाते. सदर प्रकरणात प्रमाणपत्र मिळण्यास इतका विलंब झाला का? याची माहिती घेतो. संबंधित मुलगी आवश्यक कागदपत्रासह बुधवारी जिल्हा रुग्णालयात आल्यास तिला तत्काळ प्रमाणपत्र देण्यात येईल, असेही डॉ. चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अपंगत्त्वाच्या प्रमाणपत्रासाठी चिमुकलीचे तीन वर्षापासून हेलपाटे !
By admin | Updated: December 11, 2014 00:41 IST