औरंगाबाद : मुंबईवगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये तीन सदस्यांची प्रभाग पद्धत ठेवण्याचा निर्णय बुधवारी (दि. २२) राज्य शासनाने घेतला. या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे. या निर्णयाचा शहराला किती फायदा होईल, यासंदर्भात काही निवृत्त अधिकारी, शहर विकासात मोठे योगदान देणारे वास्तुविशारद यांना ‘लोकमत’ने बोलते केले. काहींनी या निर्णयावर सडकून टीका केली. राज्यात ज्या पद्धतीने तीन पक्षांची ओढाताण सुरू आहे, तशीच गत वॉर्डांमध्ये पहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया उमटली.
१९८८ पासून २०१५ पर्यंत महापालिकेच्या सहा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. सर्व निवडणुका एक वॉर्ड पद्धतीने घेण्यात आल्या. १९८८ मध्ये महापालिकेचे फक्त ६० वॉर्ड होते. आता ११५ वॉर्ड आहेत. एप्रिल २०१९ मध्ये महापालिकेचा कार्यकाल संपला. दीड वर्षांपासून सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार निवडणुकीकडे डोळे लावून बसले आहेत. निवडणूक कधी होईल, हे निश्चित नाही. त्यात बुधवारी राज्य शासनाने महत्त्वर्ण निर्णय घेतला. मुंबईवगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत राहील. ३ वॉर्डांचा एक प्रभाग असेल. या निर्णयाचा शहराला फायदा होईल का तोटा यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यात आले.
निधी उपलब्ध झाला तर ना...
महापालिकांमध्ये निधीचा प्रचंड तुटवडा असतो. दोन ते तीन मोठ्या मनपावगळता इतर आर्थिक डबघाईला आलेल्या आहेत. तीन वॉर्डांचा एक प्रभाग केला तर तीन नगरसेवक निवडून येतील. त्यांना निधी मिळाला तरच प्रभागाचा विकास होईल. निधी मिळूनही तिन्ही नगरसेवक एका मताचे, एका पक्षाचे हवेत. त्यांच्यातच आपसात ओढाताण असेल तर अजिबात विकास होणार नाही. पूर्वीची एक वॉर्ड पद्धतच योग्य होती. प्रशासनालाही काम करणे सोपे जात होते.
डॉ. पुरुषोत्तम भापकर, निवृत्त मनपा तथा विभागीय आयुक्त
एका मताने निर्णय घ्यावे लागतील
एका वॉर्डात एकच नगरसेवक असला तर खूप चांगले. कारण त्याच्यावर वॉर्डाच्या विकासाची जबाबदारी असते. जशी आमदारावर आपल्या मतदारसंघाची असते. आता तीन नगरसेवकांचा एक प्रभाग केला तर कामे कशी होतील? ते एकमेकांवर कामे ढकलतील. तिघेही सकारात्मक विचारांचे असायला हवेत. एका मताने निर्णय घ्यावे लागतील. असे झाले तरच प्रभागाचा विकास होईल.
सी.एस. सोनी, निवृत्त शहर अभियंता, मनपा
अगोदरच वाईट अवस्था त्यात
सध्या एका नगरसेवकाला पथदिवे बंद असल्याचे सांगितले तरी दिवे लवकर लागत नाहीत. प्रभाग पद्धतीत तीन नगरसेवक राहतील. तिघे मिळून दिवे लावणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राज्यात तीन पक्षांची ओढाताण आम्ही बघतोय. हीच परिस्थिती नंतर वॉर्डात बघायला मिळू शकते. या निर्णयामुळे शहराचा सर्वांगीण विकास होणे शक्य नाही.
- प्रदीप देशपांडे, वास्तुविशारद