पैठणमध्ये तीन कोटींची वाळू जप्त
By Admin | Published: June 30, 2014 12:48 AM2014-06-30T00:48:37+5:302014-06-30T01:04:58+5:30
पैठण : नगर जिल्ह्याची हद्द सोडून पैठण तालुक्याच्या हद्दीत गोदावरीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या नगरच्या ठेकेदाराच्या मुसक्या आज जंबो कारवाई करीत आवळल्या.
पैठण : नगर जिल्ह्याची हद्द सोडून पैठण तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या गोदावरीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या नगरच्या ठेकेदाराच्या मुसक्या आय.पी.एस. दीक्षित गेडाम यांनी आज जंबो कारवाई करीत आवळल्या. पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत मुंगी, ता. शेवगाव येथील वाळूपट्ट्यातून अंदाजे तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या शेवगाव तालुक्यातील मुंगीचा वाळूपट्टा अहमदनगर जिल्हा प्रशासनाने लिलाव करून राजेंद्र दौड यांना दिला होता. मुंगी व पैठण तालुक्यातील नायगाव ही दोन्ही गावे गोदावरीच्या दोन तीरावर आमनेसामने आहेत. अलीकडे नायगाव, तर पलीकडे मुंगी व या दरम्यान येणाऱ्या गोदावरी पात्रात अर्धी हद्द नगर जिल्ह्याची व अर्धी हद्द औरंगाबाद जिल्ह्याची येते. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील वाळूपट्टा लिलाव केला होता; परंतु गेल्या काही महिन्यांपासून संबंधित वाळूपट्ट्याचा ठेकेदार हा औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण हद्दीत येणाऱ्या गोदावरीच्या वाळूपट्ट्यातून बोट, सक्शन पंप, पोकलँड, जेसीबीच्या साह्याने अवैधरीत्या वाळूचा उपसा करून लाखो रुपयांची वाळू नगर जिल्ह्यात पुरवठा करीत होता.
याबाबतची खबर मिळताच आयपीएस अधिकारी दीक्षित गेडाम यांनी पोलीस कर्मचारी एस.बी. पवार, संतोष चव्हाण, सचिन भुमे, सिराज पठाण, किरण गोरे, साबळे रवी, राम आडे, सोपान झाल्टे यांनी आज दुपारनंतर विविध वाहनांनी गोरेंच्या पट्ट्यात जाऊन छापा मारला. यावेळी पैठण हद्दीतून उपसा करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ४ बोटी, ८ ट्रक, ४ पोकलँड, तीन मॅजिक पेन रॉयल्टी बुक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गेडाम येताच सर्व जण फरार
दीक्षित गेडाम यांनी नायगाव हद्दीत सुरू असलेल्या वाळू उपशावर छापा मारताच वाळूपट्ट्यातील सर्व जण फरार झाले. ट्रकचे चालक ट्रक सोडून पळाले. बोटीवरील आॅपरेटर पाण्यात उड्या मारून पोहत पोहत निघून गेले, तर वाळूपट्टा कार्यालयातील व्यवस्थापकही सर्व कागदपत्रे सोडून पळाले. (वार्ताहर)
पैठण तहसील कार्यालयाचे माफियांना अभय
गेल्या काही महिन्यांपासून नगरचे वाळू तस्कर पैठण हद्दीतून राजरोसपणे वाळूचा उपसा करीत आहेत. याद्वारे दररोज लाखो रुपयांच्या वाळूच्या व्यवहाराची उलाढाल होते. दिवसाढवळ्या होत असलेल्या या वाळू तस्करीला पैठण तहसीलचे अभय होते, अशी चर्चा होत आहे. नायगावच्या तलाठ्याने याबाबत पैठण तहसीलदारांना अहवाल दिला होता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आजही आय.पी.एस. गेडाम यांनी भेट देऊन वाळूपट्ट्यातून तहसीलदारांना बोलावून घेतले. त्यानंतर तहसीलदार संजय पवार व दोन तलाठी वाळूपट्ट्यात अवतरले व पुढील कारवाई करण्यात आली. आजच्या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. या प्रकरणी तहसील प्रशासनाची फिर्याद देण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होईल, असे आय.पी.एस. दीक्षित गेडाम यांनी सांगितले.