बीड : अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्यासाठी एका अल्पवयीन युवकाने तिचे मोबाईलमध्ये फोटो काढून त्याद्वारे तिच्या नातेवाईकांना बदनामीची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी पेठ बीड भागात उघडकीस आली. याप्रकरणी युवकांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिकते. पेठ बीड भागातील इस्लामपुरा भागात राहणारी ही मुलगी दररोज शाळेत पायी ये-जा करते. याच भागातील १७ वर्षीय युवकाने तिचे रस्त्यावरून ये-जा करताना आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे हावभाव असलेले फोटो काढले. त्यानंतर त्यात बदल घडवून सोबत स्वत:चेही फोटो जोडले. त्याद्वारे तो मागील सहा महिन्यांपासून मुलीला लग्नासाठी गळ घालत होता. तिने दाद न दिल्यामुळे तो नातेवाईकांनाही धमकावू लागला. पीडित मुलीच्या आजोबांनी त्याला घरी बोलावून समज दिली. त्यावरही त्यात सुधारणा झाली नाही. तुमच्या मुलीसोबत माझे लग्न लावा, अन्यथा मी तिच्या लग्नात सर्व नातेवाईकांना माझ्याकडील फोटो दाखवीन, अशी टोकाची धमकी त्याने दिली. फोटो परत मागितले तेव्हा त्याने जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यामुळे वैतागलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी पेठ बीड ठाणे गाठले.पीडित मुलीच्या फिर्यादीवरून युवकासह त्याचे वडील सय्यद अमजद सय्यद अख्तर, आई सय्यद रेहानाबी सय्यद अमजद (रा. इस्लामपुरा) यांच्याविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. (प्रतिनिधी)
फोटो काढून बदनामीची धमकी
By admin | Updated: November 19, 2016 00:49 IST