उन्मेष पाटील, कळंबतालुका कृषी कार्यालयाने महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत केलेल्या तब्बल ७७ लाखांच्या कामांबाबत साशंकता निर्माण केली जावू लागली आहे. या कामांवर केवळ काही हजारांचे पॉलिश करुन लाखो रुपयाची बिले उचलण्यात आल्याची चर्चा सध्या संबंधित गावांमध्ये रंगली आहे. यापैकी काही गावांतून तक्रारी होवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संशयाला आणखीच बळ मिळत आहे. त्यामुळे अशा कामांची त्रयस्त पथकामार्फत चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.कळंब तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने मागील वर्षी महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत १७ गावांमध्ये ७७ लाख २२ हजार ९७८ रुपये खर्चाचे सिमेंट नाला बंधारे, मातीनाला बंधारे यांची तुट-फुट दुरुस्ती व गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली होती. पावसाचे पाणी या नादुरुस्त बंधाऱ्यांतून वाया जावू नये, ते बंधाऱ्यात साठावे व त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी शासनाने हे अभियान हाती घेतले होते. कळंब तालुका कृषी कार्यालयाने या अभियानाचाच बोजवारा उडविल्याची चर्चा जोरात सुरू आहे. याची खातरजमा करण्यासाठी कृषी कार्यालयाने केलेली दुरुस्ती व गाळ काढलेल्या काही बंधाऱ्यांची पाहणी केली असता चर्चेमध्ये बऱ्यापैकी सत्यता असल्याचे प्रथमदर्शनी दिसत येत आहे. तालुक्यातील हावरगाव शिवारामध्ये पाच सिमेंंट नाला बंधाऱ्याची फुट-तुट दुरुस्त करणे व गाळ काढणे या कामासाठी ६ लाख २६ हजार १०१ रुपये खर्चाची मंजुरी दिली होती. परंतु, या कामांवर प्रत्यक्ष खर्च मात्र काही हजारांमध्येच झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तीन सिमेंट बंधाऱ्याची पाहणी केली असता, सिमेंटच्या एकाच पोत्यामध्ये या बंधाऱ्याची दुरुस्ती झालेली असू शकते, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर आलेला निधी नेमका कोणाच्या घशात गेला? हे प्रश्नचिन्हच आहे.हावरगावसारखाच प्रकार तालुक्यातील या अभियानांतर्गतकरण्यात आलेल्या १७ गावातील बंधारे दुरुस्तीच्या व गाळ काढण्याच्या कामातही झाल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत हावरगाव, दहिफळ येथील तक्रारी तालुका कृषी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.दरम्यान, ही कामे खरोखरच निकषानुसार झाली की थातूरमातूर, याची चौकशी व्हावी, अशी मागणी आता खुद्द त्या-त्या गावांतील शेतकऱ्यांतून होवू लागली आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून विशेष पथकाचे गठण करून करावी, असेही अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यामध्ये लक्ष घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
हजारोंच्या पॉलिशवर उचलली लाखोंची बिले ?
By admin | Updated: November 10, 2014 01:17 IST