औरंगाबाद : शतकातील काही दुर्मिळ तारखांपैकी एक तारीख म्हणजे १०- १०- २०२०. या युनिक तारखेला लग्न करण्याचा निश्चय केलेल्या जोडप्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. एक तर अधिक मास असल्याने विवाह मुहूर्त नाहीत आणि या सर्वाला फाटा देत नोंदणी विवाह करायचा ठरविला तर शासकीय कार्यालयाला सुटी आल्याने विघ्न निर्माण झाले आहे.
१०- १०- २०२० या तारखेला शहरात मोठ्या संख्येने विवाह होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण नेमकी ही दुर्मिळ तारीख अधिक मासात आली आहे. या महिन्यात लग्न करत नसल्याने पंचांगात विवाह मुहूर्त नाहीत.
अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राचीच उपशाखा आहे. त्यानुसार शनिवारच्या दिनांकाची बेरीज २४ म्हणजेच पुन्हा २ अधिक ४ म्हणजेच ६ अशी येते. अंकशास्त्रानुसार ६ हा अंक सर्वात शुभ अंक समजला जातो, असे अंकशास्त्रज्ञ डॉ. मनिषा देशपांडे यांनी सांगितले.