लालखाँ पठाण , गंगापूर गंगापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना पाणीपुरवठा करणार्या टँकरला परवानगी देण्यास तहसील प्रशासन उदासीन आहे, त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शिल्लेगाव, शेंदुरवादा, लासूर स्टेशन, तुर्काबाद या परिसरातील गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथील ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी या करिता ग्रामपंचायतीच्या ठरावासह पंचायत समितीकडे टँकर मिळावे यासाठी प्रस्ताव सादर करून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला. सदर प्रकरण तहसीलच्या अखत्यारीतील असल्याने पंचायत समितीने तांत्रिक मान्यता देऊन तहसील कार्यालयात सादर केले. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर २४ तासांत संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी शहानिशा करून तात्काळ अहवाल देऊन गरज असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आदेश द्यावे व टँकर सुरू करावे असे शासनाचे सक्त आदेश आहेत, असे असताना या आदेशाला तहसीलदारांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. निवडणूक काळात प्रचारादरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात गंगापूर येथे आले असता पाणीटंचाईसंदर्भात काही सरपंचांनी मंत्रिमहोदयांच्या कानी समस्या घातल्या होत्या. तहसील प्रशासन हे टंचाईग्रस्त गावास टँकर प्रस्ताव मंजूर करीत नसल्याचे गाºहाणेसुद्धा पदाधिकार्यांनी मांडले. यावेळी पालकमंत्र्यांनी तहसीलदारांना सक्त ताकीद देऊन पाणीटंचाईसंदर्भात कुठल्याच प्रकारची सबब ऐकून घेतली जाणार नाही. नागरिकांना वेळीच पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्या आदेशालासुद्धा तहसीलदारांनी कानाडोळा करीत प्रस्ताव मंजुरीस दिरंगाई केली. काही ठिकाणी गेल्या दीड महिन्यांपासून पाण्याचे टँकर प्रस्ताव मंजुरीविना पडून असून यास तहसील प्रशासनच जबाबदार असल्याचे सरपंच सांगत आहेत. तालुक्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याकारणाने ओढे-नाले खळखळून वाहिले नाहीत, त्यामुळे परिसरातील विहिरी, शेततळे, पाझर तलाव अद्याप कोरडेच आहेत. विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे. गोदावरी नदीवरील पैठण येथील धरणाची पाणीपातळी उन्हामुळे दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तालुक्यातील अतिमहत्त्वाचे टेंभापुरी व शिल्लेगाव मध्यम प्रकल्प पावसाळा प्रारंभापासूनच कोरडेठाक पडलेले आहेत.
गंगापूर तालुका तहानलेला
By admin | Updated: May 15, 2014 00:26 IST