प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाददेशात उज्जैन, त्र्यंबकेश्वर व औरंगाबादेतील भावसिंगपुरा या तीन ठिकाणी भगवान शिव-पार्वतीचे समोरासमोर मंदिर आहे. त्यातही भावसिंगपुऱ्यातील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर सुमारे २० फूट खोल बारवेत आहे. शिव-पार्वतीच्या दर्शनासाठी २० ते २५ पायऱ्या खाली उतरावे लागते. सुमारे ३५० वर्षांपूर्वीचे हे मंदिर ऐतिहासिक ठेवा आहे. शहराच्या पश्चिमेला जुन्या भावसिंगपुऱ्यात सत्येश्वर शिव-पार्वती मंदिर आहे. ज्यांना या मंदिराचे वैशिष्ट्य माहीत आहे, असे भाविक श्रावणात दर सोमवारी दर्शनासाठी येतात. सहसा बारवेत मंदिर आढळत नाही. येथे मोठी बारव असून त्यात शिव व पार्वती निवास करीत आहेत. वरून बारवेत पाहिले की, ५० ते ६० फूट खोलवर पाणी दिसते, मंदिर दिसत नाही. छोट्या दारातून पायऱ्या उतरल्यावर बारवेच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस भिंतीच्या आत लहान खोली दिसते. पूर्व बाजूस भगवान शिवाची पिंड आहे, तर त्याच्यासमोर पश्चिमेस पार्वतीचे मंदिर आहे. पार्वतीची पूर्वाभिमुख छोटी मूर्ती आहे. येथून आणखी २५ ते २० पायऱ्या खाली उतरल्यावर उत्तरेस बारवेत पाणी लागते. याच उत्तर बाजूस ५० फूट उंच भिंत आहे. या भिंतीवर हत्ती मोट आहे. या बारवेच्या भिंतीवरच हनुमानाची छोटी मूर्ती आहे. सुमारे ५० फूट खोल व ५० फूट रुंद ही बारव पाहिल्यावर मन प्रसन्न होते. शहरापासून दूर निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. भावसिंगपुऱ्यातील ज्येष्ठ नागरिक मंदिराविषयी सांगतात की, निझामाच्या सैन्यातील भावसिंग नावाच्या सरदाराने भावसिंगपुरा गाव वसविले. या परिसरात सैनिकांची छावणी उभारली होती. शिवभक्तांसाठी येथील बारवेत शिव-पार्वतीचे मंदिर बांधले. हे ३५० वर्षांपूर्वीचे मंदिर मराठवाड्यातील एकमेव आहे. शिव-पार्वतीचा विवाह सोहळादरवर्षी महाशिवरात्रीच्या वेळेस येथे शिव-पार्वतीचा विवाह सोहळा होतो. त्या दिवशी पहाटे दुग्धाभिषेक,पूजा,आरती करण्यात येते. दिवसभर होमहवन,आरती व महाप्रसाद वाटला जातो. रात्री १०.३० वाजता पार्वतीच्या मूर्तीला हळद लावण्यात येते. नंतर वस्त्र, अलंकार घालून ओटी भरली जाते. याच वेळी भगवान शंकरालाही अलंकाराने सजविण्यात येते. रात्री १२.३० वाजता सनई चौघड्यांच्या साक्षीने मंगलाष्टके म्हणत शिव-पार्वतीचा विवाह सोहळा होतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. आज मंदिरात...मंदिरातील पुजारी सुनील कुलकर्णी यांनी सांगितले की, दर श्रावणी सोमवारी सकाळी ७.३० वाजता भगवान शिव-पार्वती यांची पूजा व आरती करण्यात येणार आहे. यानंतर अभिषेक, रुद्राभिषेक होणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता आरती करण्यात येणार आहे.
देशातील तिसरे शिव-पार्वती मंदिर भावसिंगपुऱ्यात
By admin | Updated: July 28, 2014 01:03 IST