व्यंकटेश वैष्णव , बीडराष्ट्रीय कुटुंब कल्याण अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पॅनलची मागील दोन वर्षात एकही बैठक झाली नाही. असे असतानाही पॅनलवरून डॉ. अशोक मुंडे यांची गच्छंती केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही कारवाई पॅनलला विश्वास न घेता तसेच साधी बैठकही न घेता झाली हे विशेष. या प्रकारावरून आश्चर्य व्यक्त होत आहे.जिल्हा आरोग्य विभागाला वर्षभरात १८ हजार कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी काही डॉक्टरांचे पॅनल बनविण्यात आले आहे. यात जिल्हा शल्यचिकित्सक हे पॅनल प्रमुख आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी हे सदस्य, सचिव तर अतिरिक्त शल्य चिकित्सक सदस्य आहेत. मागील दोन वर्षात या पॅनलची एकही बैठक झाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. जर पॅनलची बैठकच झाली नाही तर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या पॅनलवर असलेले स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अशोक मुंडे यांची पॅनलवरून गच्छंती कशी केली ? याचा ‘अर्थ’ काय ? असा सवाल उपस्थित झाला आहे. डॉ. अशोक मुंडे यांची पॅनलवरून झालेल्या गच्छंतीबाबतची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, सुंदर चव्हाण यांनी केली आहे.प्रोसेडिंगलाही फाटाप्रत्येक पॅनलच्या बैठकीचे प्रोसेडिंग करणे आवश्यक असते. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पॅनलच्या बैठकीचे कुठलेच रेकॉर्ड नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या बैठकीदरम्यान अथवा डॉ. अशोक मुंडे यांच्या पॅनलवरील गच्छंतीबाबत कोणतेही प्रोसेडिंग न करता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी २ जून २०१६ रोजी लेखी पत्र काढून डॉ. मुंडे यांची शस्त्रकियेसाठी सेवा घेऊ नये, असे उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयाला कळविले आहे.
कुटुंब कल्याण नियोजनाची दोन वर्षांत एकही बैठक नाही
By admin | Updated: June 5, 2016 00:39 IST