छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगर पोलिस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वृद्धेला घाबरवून तब्बल ९.६ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. १२ मे रोजी सकाळी ११ वाजता सुखद सहवास कॉलनीत ही घटना घडली. शहरातील तोतया पोलिसांनी लुटल्याची ही दहावी घटना असताना पोलिस एकाही घटनेची उकल करू शकलेले नाही, हे विशेष.
मंगला गंडागुळे (७५, रा. सुखद सहवास काॅलनी, गारखेडा) या १२ मे रोजी सकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी परिसरात गेल्या होत्या. खरेदी करून घरी परतत असताना अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील दोघांनी त्यांना थांबवले. नाव, घराचा पत्ता विचारून 'तुम्हाला माहिती नाही का, सध्या युद्धाचे वातावरण आहे. सोने घालून कशाला फिरता?' असे म्हणत आवाज वाढवला. स्वत: पोलिस असल्याचे सांगून दागिने काढून ठेवण्यास सांगितले. मंगला यांनी माझे घर जवळच आहे, घरी गेल्यावर काढते, असे सांगताच त्यांनी पुन्हा तुमच्या जिवाला धोका असल्याचे सांगत जागेवर दागिने काढण्यासाठी बळजबरी केली. त्यांचे दागिने काढून त्यांच्या पिशवीत ठेवण्याचे नाटक करत दोघेही निघून गेले. ते जाईपर्यंत मंगला यांनी पिशवी तपासली. मात्र, त्यात दागिने नव्हते. तोतया पोलिसांनी हातचलाखीने त्यांच्या अंगावरील सोन्याची ३१ ग्रॅमची सोनसाखळी, ६ तोळ्यांच्या बांगड्या व ६ ग्रॅमची अंगठी लंपास केली होती.
जवाहरनगरमध्येच सुळसुळाटजवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तोतया पोलिस, सोनसाखळी चोरांनी हैदोस माजवला आहे. शहरात सर्वाधिक लुटमार, तोतया पोलिसांच्या घटना याच ठाण्याच्या हद्दीत घडल्या. मात्र, त्यांच्याकडून यावर कुठलीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. शिवाय, एकाही गुन्ह्यात जवाहरनगर पोलिस आरोपींचा शोध लावू शकले नाहीत.