निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे साप्ती ता़ हदगाव येथे लागलेल्या आगीत आठ घरे जळून खाक झाली असून अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिस पाटील कबीरदास कदम यांनी दिली़मौजे साप्ती येथे मंगळवारी रात्री एक वाजता प्रथम अंबादास सयाजी कदम यांच्या घराला आग लागली़ या आगीने रौद्र रूप धारण केले़ या आगीत शेजारील सात घरे भस्म झाली़ आग लागल्याने एकच धावपळ उडाली़ सर्व ग्रामस्थांनी विद्युत मोटार पंपद्वारे सकाळी ४ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली़ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते़ अग्नीशमन दल येईपर्यंत आग आटोक्यात आली होती़या आगीत संसारोपयोगी साहित्य, मोटरसायकल, खत, बी-बियाणे, धान्य, कपडा आदी जळून खाक झाले़ या आगीत दिगांबर तुळशीराम कदम, केशव किसन कदम, पंजाब वामन कदम, नथ्थुराम सदाशिव कदम, अंबादास कदम, दत्ता संभाजी कदम, रामदास कदम, किसन कदम यांची घरे जळून खाक झाली़ घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी पन्नावार, तलाठी वडकुते, पोलिस पाटील कबीरदास कदम यांनी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला़ घटनास्थळास शिवसेना तालुकाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर, बाबुराव कदम, सुधाकर महाजन, विवेक देशमुख, बालासाहेब कदम यांनी भेट देवून सांत्वन केले़ आगीत तीन जनावरे भाजली, जीवितहानी मात्र झाली नाही़ (वार्ताहर)
साप्ती येथे आगीत आठ घरे खाक
By admin | Updated: June 27, 2014 00:15 IST