छत्रपती संभाजीनगर : अन्याय-अत्याचाराच्या संदर्भात दलितांनी केवळ तक्रारी करीत बसू नये. प्रतिकार करायला शिकले पाहिजे. शासन हे अन्याय-अत्याचार थांबवू शकत नसेल तर मग स्वसंरक्षणासाठी दलितांना शस्त्रास्त्रे पुरवा, अशी मागणी सोमवारी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, लाँग मार्चचे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.
३१व्या नामविस्तार दिनानिमित्त ते शहरात दाखल झाले. दुपारी पत्रकार परिषद घेऊन सायंकाळी त्यांची आंबेडकर विधि महाविद्यालयासमोर जाहीर सभाही झाली. त्यांनी सांगितले, होय आम्ही सत्तेबरोबर आहोत. सत्तेबरोबर राहिल्याने अन्याय-अत्याचार थांबतील. थोडाफार तरी दिलासा मिळेल, ही आमची भावना आहे; परंतु अन्याय-अत्याचाराची मालिका थांबताना दिसत नाही. परभणीचे उदाहरण ज्वलंत आहे. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचीच तोडफोड कशी होते? आणि ती करणारा मनोरुग्णच आहे, असे का सांगितले जाते? या घटना सहज शक्य नाहीत. यामागे नक्की जातीय शक्ती असणार.
नामांतराचा लढा हा समतेचा होता, सामाजिक न्यायाचा होता. त्यासाठी आम्ही नागपूरहून लाँग मार्च काढला होता. पण माझे असे म्हणणे आहे की, भीमसैनिकांचा लढा आताही चालू आहे. या देशात राजकीय लोकशाही आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राजकीय लोकशाहीबरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही हवी होती. ही अशी लोकशाही येईपर्यंत हा लाँग मार्च चालू राहणार आहे, अशी नि:संदिग्ध ग्वाही प्रा. कवाडे यांनी दिली.
त्यांनी आणखी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशावर प्रखर प्रेम होते व त्यांची राष्ट्रनिष्ठा निस्सीम होती. याचेच प्रतीक म्हणजे त्यांनी लिहिलेले संविधान. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे; परंतु या देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा कुंभमेळा निर्माण होण्याची गरज आहे.