छत्रपती संभाजीनगर : बौद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनाच्या ऐतिहासिक धम्मध्वज यात्रेचे सोमवारी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर बौद्धगया महाविहार मुक्तीसाठी कारावास भोगलेले क्रांतिकारी भन्ते विनाचार्य व भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वात क्रांतिचौक ते बुद्धलेणी अशी धम्मध्वज यात्रा काढली. यात्रेचा समारोप धम्मसभेत झाला. आंदोलनाची पुढील दिशा चैत्यभूमी येथे ठरणार असून २ सप्टेंबर रोजी चैत्यभूमीला येण्याचे आवाहन भन्ते विनायार्च यांनी बौद्ध उपासक, उपासिकांना केले.
शहरात सोमवारी दुपारी १ वाजता यात्रा क्रांतीचौकात दाखल झाली. भन्ते विनाचार्य यांचे अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी स्वागत केले. क्रांतीचौकातून भन्ते विनाचार्य, भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो, भन्ते संघप्रिय, भन्ते नागसेन, भन्ते आर. आनंद यांच्या नेतृत्वात यात्रेला सुरुवात झाली. पांढरे वस्त्र परिधान करून व हाती पंचशील झेंडे घेऊन उपासक, उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बुद्धलेणीवर पोहचल्यानंतर यात्रेचे सभेत रूपांतर झाले. सभेला मार्गदर्शन करताना भन्ते विनयार्च यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या लढाच्या इतिहास सांगितला. भन्ते अनागारी धम्मपाल यांनी महाबोधी विहार मुक्तीसाठी लढा उभारला. या लढ्याला जगभरातून पाठिंबा मिळाला. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी ही न्याय मागणी आहे. मागील ५० वर्षांपासून विविध टप्प्यात विविध भन्तेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे. तरीही बिहार सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. यावर्षी मुक्ती आंदोलनाचा लढा अंतिम टप्प्यात आला असताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली तो थांबविला. त्यामुळे हा लढा आणखी तीव्र करण्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून धम्म ध्वजयात्रा काढून प्रबोधन करण्यात येत आहे.
ही यात्रा २ किंवा ३ सप्टेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमीला पोहोचणार आहे. या मुक्ती आंदोलनाची दिशा काय असावी याचा निर्णय चैत्यभूमीच्या सभेत होणार आहे. यात्रेच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय भिक्खु संघ, सर्वपक्षीय आंंबेडकरवादी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे दिपक निकाळजे, कुंदन लाटे, धम्मा धन्वे, प्रांतोष वाघमारे, अमित वाहूळ, कपिल बनकर, विष्णू जगताप अरविंद कांबळे, यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.