नवे वर्ष सुरू झाले अन् आला ‘ट्यॅह्या ट्यॅह्या’चा आवाज; २०२४ मध्ये जन्मलेल्या पहिल्या बाळाचे अनोखे स्वागत 

By संतोष हिरेमठ | Published: January 2, 2024 01:11 PM2024-01-02T13:11:10+5:302024-01-02T13:14:19+5:30

डाॅक्टर सांगतात, ‘मुलगी झाली... शुभेच्छा’. आजी-आजोबांच्या आनंदाला सीमा राहात नाही. विशेष म्हणजे जन्माची वेळ रात्री १२:०१ वाजेची. २०२४ मध्ये जन्मलेले पहिले बाळ. 

The new year began and the sound of 'tyahya tyahya' came; A unique welcome to the first baby born in 2024 | नवे वर्ष सुरू झाले अन् आला ‘ट्यॅह्या ट्यॅह्या’चा आवाज; २०२४ मध्ये जन्मलेल्या पहिल्या बाळाचे अनोखे स्वागत 

नवे वर्ष सुरू झाले अन् आला ‘ट्यॅह्या ट्यॅह्या’चा आवाज; २०२४ मध्ये जन्मलेल्या पहिल्या बाळाचे अनोखे स्वागत 

छत्रपती संभाजीनगर : स्थळ : घाटी रुग्णालयातील प्रसूती कक्ष. वेळ रविवारी मध्यरात्रीची. प्रसूती कक्षासमोर नातेवाईक नव्या पाहुण्याची वाट पाहत बसलेले. आतून आवाज दिला जातो आणि आजी-आजोबा धावतच आत जातात. डाॅक्टर सांगतात, ‘मुलगी झाली... शुभेच्छा’. आजी-आजोबांच्या आनंदाला सीमा राहात नाही. विशेष म्हणजे जन्माची वेळ रात्री १२:०१ वाजेची. २०२४ मध्ये जन्मलेले पहिले बाळ. 

...आणि परिवार आनंदला
घाटी रुग्णालयातील प्रसूती कक्षात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ८ गरोदरमाता दाखल होत्या. एका महिलेची सरत्या वर्षात रात्री ११:५८ वाजता प्रसूती झाली. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांनी १२.०१ वाजता संजयनगरच्या रहिवासी परवीन फईम शेख यांची नैसर्गिक प्रसूती झाली. त्यांनी गोड मुलीला जन्म दिला. 

डाॅक्टरांनी त्यांना सांगितले, ‘२०२४ मधील हे पहिले बाळ आहे...’. त्यामुळे शेख कुटुबियांचा आनंद द्विगुणित झाला. १२:१५ वाजता जन्मलेल्या दुसऱ्या बाळाचे आणि त्याच्या आजी-आजोबांचेही स्वागत करण्यात आले.  

नव्या वर्षातील पहिली प्रसूती नाॅर्मल झाली. नववर्षाची सुरुवातही बाळाच्या जन्मानेच झाली. हे अधिक आनंददायी आहे. 
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख, घाटी 

नव्या वर्षातील पहिल्या बाळाचे आगमन आमच्या कुटुंबात झाले. मुलगी हवी होती. मुलगीच झाली. खूप आनंदी आहोत. 
- नईमा शेख हुसेन, आजी

Web Title: The new year began and the sound of 'tyahya tyahya' came; A unique welcome to the first baby born in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.