छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांमध्ये कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी फर्दापूर येथील राजकुंवर महाविद्यालयात भेट दिल्यानंतर प्राचार्य, केंद्रप्रमुखाविनाच परीक्षा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे कुलगुरूंच्या सूचनेनुसार परीक्षा संचालकांनी प्राचार्यांकडे खुलासा मागितला आहे.
विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मागील तीन दिवसांपासून विविध परीक्षा केंद्रांना भेटी देण्यास सुरूवात केली. कुलगुरू डॉ. फुलारी यांनी गुरुवारी (दि.२४) तीन महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्यात फर्दापूर येथील राजकुंवर महाविद्यालयाचा समावेश आहे. या महाविद्यालयात कुलगुरू पोहोचले तेव्हा परीक्षेचा हॉल तिसऱ्या मजल्यावर होता. तिथे पोहोचण्यासाठीही अनेक अडथळे पार करावे लागले. खालच्या मजल्यावर रिकाम्या खोल्या असताना परीक्षा तिसऱ्या मजल्यावर घेण्यात येत होती. कुलगुरू वर पोहोचेपर्यंत विद्यार्थांच्या कॉपी बॅगमध्ये भरून वर्गाबाहेर आणण्यात आल्या. या बॅगाची तपासणीही कुलगुरूच्या पथकाने केली तेव्हा कॉपी आढळून आल्या आहेत.
तसेच परीक्षा केंद्रावर प्राचार्य, केंद्रप्रमुखांची विचारणा केल्यानंतर ते उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. वर्गामध्ये शिक्षकेत्तर कर्मचारीच परीक्षा घेत असल्याची माहिती परीक्षा विभागातून देण्यात आली. त्यामुळे कुलगुरूंच्या सूचनेनुसार परीक्षा संचालकांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून खुलासा मागितला आहे. याविषयी उपप्राचार्य डॉ. ए. जी. बेडवाल यांना विचारले असता, त्यांनी केंद्रप्रमुख प्रवासात असल्याची माहिती दिली.
दोन महाविद्यालयांत सुरळीत परीक्षाकुलगुरूंनी राजकुंवर महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर गोळेगाव येथील परीक्षा केंद्राची पाहणी केली. त्यानंतर इंद्रराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला कुलगुरूंनी भेट दिली. या केंद्रांवर परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले.
प्राधिकरणांच्या सदस्यांच्या महाविद्यालयांना भेटीविद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद, अभ्यास मंडळांचे सदस्य असलेल्या महाविद्यालयांना भेटी देण्याचा धडाकाच कुलगुरूंनी लावला आहे. विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्या या सदस्यांच्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा कशा पद्धतीने घेतात, याविषयीची पाहणीही या माध्यमातून कुलगुरू करत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
खुलासा मागवला आहेकुलगुरूंनी फर्दापूर येथील राजकुंवर महाविद्यालयाला अचानक भेट दिल्यानंतर त्याठिकाणी प्राचार्य, केंद्रप्रमुखच आढळले नाहीत. त्यामुळे संबंधितांकडून खुलासा मागविला आहे. या महाविद्यालयावर कारवाई करण्याचा निर्णय परीक्षा विभागाच्या बोर्डामध्ये घेण्यात येणार आहे.-डॉ. भारती गवळी, संचालक, परीक्षा मंडळ