लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी निधी मिळावा म्हणून महापौर बापू घडमोडे यांनी बरीच धडपड केली. त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळाले. मात्र, मागील तीन महिन्यांपासून ३१ रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढण्यात असंख्य विघ्न निर्माण होत आहेत. चार दिवसांपूर्वीच शासनाने १०० कोटींच्या चार निविदा काढण्यास मंजुरी दिली. तरी प्रशासनाने शुक्रवारी निविदा काढल्या नाहीत. मंगळवारी निविदा प्रसिद्ध करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.मंगळवारी म्हणजेच ३ आॅक्टोबर रोजी २५ कोटींच्या चार स्वतंत्र निविदा प्रसिद्ध झाल्या तरी कंत्राटदारांना निविदा भरण्यास किमान २५ दिवसांचा वेळ द्यावा लागणार आहे. २६ व्या दिवशी निविदा उघडल्या तरी त्या मंजुरीसाठी स्थायी समितीत पाठवाव्या लागतील.स्थायी समितीची बैठक घेण्यासाठी किमान ३ दिवस अगोदर नोटीस काढावी लागते. २९ व्या दिवशी स्थायीने मंजुरी दिली तरी त्याच दिवशी कारणापुरता उतारा घेऊन कंत्राटदारांना वर्कआॅर्डर देणे अत्यंत अवघड आहे. भाजपचे विद्यमान महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाळ ३१ आॅक्टोबरपर्यंतच आहे. आता त्यांच्याकडे फक्त २७ दिवस आहेत. त्यातही चार रविवार आणि दोन सार्वजनिक सुट्या आहेत. २१ दिवसच महापौरांकडे कामकाजासाठी शिल्लक आहेत. आपल्या कार्यकाळातच १०० कोटींच्या कामांचा नारळ फुटावा यादृष्टीने महापौरांचे प्रयत्न सुरू आहेत. उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
१०० कोटींच्या निविदा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:37 IST