औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील हिमायत बाग परिसरात एटीएस पथकातील पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोन आरोपींना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शहरातील हिमायतबाग येथे 2012 मध्ये एटीएस पथकातील पोलिसांवर गोळीबार करुन हवालदार शेख आरेफ यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद अबरार उर्फ मुन्ना उर्फ इस्माईल अब्दुल बाबुखाँ आणि मोहम्मद शाखेर हुसेन उर्फ खलील अखिल खिलजी यांना दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी ठोठावली, तर इतर दोन आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. दरम्यान, याप्रकरणी गेल्या महिन्यात सुनावणी सुरु झाली. त्यानंतर अवघ्या 16 दिवसांत या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सहाव्या दिवशी म्हणजे आज न्यायालयाने दोघांनी सुटका केली आणि दोघांनी दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 26 मार्च 2012 रोजी औरंगाबादेत आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांना पकडण्यासाठी औरंगाबाद एटीएसचे तत्कालीन अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या पथकाने हिमायतबागेत सापळा रचला होता. यावेळी दहशतवाद्यांनी एटीएसवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यात पोलीस हवालदार शेख आरेफ यांना गोळी लागली होती. बचावासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अतिरेकी अझहर ऊर्फ खलील कुरेशी ठार झाला, तर महंमद शाकेरच्या पायाला गोळी लागल्याने जखमी झाला. यावेळी पाठलाग करून एटीएसने अतिरेकी अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ ईस्माईल ऊर्फ अब्दुल बाबूखान (रा. चंदननगर, इंदौर, मध्यप्रदेश) यास पकडले होते. यानंतर पोलिसांनी अन्वर हुसेन (रा. लाभारिया, इंदौर, मध्यप्रदेश) याला गजाआड केले होते. त्यांच्याकडून 4 गावठी कट्टे, 2 रिव्हॉल्व्हर, 17 जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. पकडलेल्या अतिरेक्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तसेच, याप्रकरणी त्याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोन महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल केले होते.
औरंगाबादमधील हिमायत बाग गोळीबार प्रकरणी दोघांना दहा वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 18:19 IST
औरंगाबाद शहरातील हिमायत बाग परिसरात एटीएस पथकातील पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोन आरोपींना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
औरंगाबादमधील हिमायत बाग गोळीबार प्रकरणी दोघांना दहा वर्षांची शिक्षा
ठळक मुद्दे हिमायत बाग गोळीबार प्रकरणदोघांना दहा वर्षांची शिक्षादोन आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका