तेर : येथील तेरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका १० वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला़ ही दुर्दैैवी घटना रविवारी दुपारी तेरणा नदीपात्रातील खोलीकरणात घडली असून, बालकाच्या मृत्यूमुळे रूग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोष केला़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेर येथील पृथ्वीराज काकासाहेब देवकते (वय-१०), प्रमोद काकासाहेब देवकते या दोघा भावंडांसह अशोक बालाजी देवकते हे तिघे रविवारी दुपारी श्री संत गोरोबा काका मंदिराजवळ तेरणा नदीपात्रात करण्यात आलेल्या शिरपूर पॅटर्नमध्ये साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते़ तेथे अशोक देवकते व पृथ्वीराज देवकते हे दोघे पाण्यात उतरले़ मात्र, ते पाण्यात बुडू लागल्याने नदीच्या काठावर बसलेल्या प्रमोद देवकते याने पोहता येत नसतानाही पाण्यात उडी मारून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, तोही पाण्यात बुडू लागल्याने ओरडू लागला़ मुलांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर मंदिराच्या भिंतीचे काम करणारे मिस्त्री चंद्रकांत मोरे यांनी पाण्यात उडी मारून प्रमोद देवकते व अशोक देवकते या दोघांना बाहेर काढले़ त्यावेळी प्रमोद देवकते यांनी माझा भाऊ पृथ्वीराजही बुडत असल्याचे सांगितल्यानंतर मोरे यांनी पाण्यात उडी मारून त्याचा शोध घेतला़ मात्र, तो सापडत नसल्याने मंदिरातील सुरक्षा रक्षक परमेश्वर सरवदे यांना बोलावून घेतले़ सरवदे यांनी पाण्यात उडी मारून शोध घेतल्यानंतर तो पाण्यात तळाला सापडला़ पृथ्वीराजला बाहेर काढून पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला़ त्यानंतर त्याला तेर येथील ग्रामीण रूग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ़ देशमुख यांनी त्याला मयत घोषित केले़ या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात एकच आक्रोष केला़ ऐन दिवाळीच्या सणात ही घटना घडल्याने देवकते कुटुंबासह तेर गावावर शोककळा पसरली आहे़ तेर येथील शिरपूर पॅटर्न अंतर्गत करण्यात आलेल्या नदीपात्रातून तेर गावाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे़ मात्र, दर्शनासाठी येणारे भाविक याच पाण्यात अंघोळ करीत असून, मयताची राखही टाकली जात आहे़ त्यातच एका बालकाचा या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे़ त्यामुळे प्रशासनाने या नदीपात्राच्या परिसराच्या स्वच्छतेसाठी व सुरक्षेसाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे़
दहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
By admin | Updated: November 8, 2015 23:37 IST