किनवट : येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या (मुलांचे) शिक्षकांचे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे मासिक वेतन झाले नाही़ त्यामुळे शिक्षक आर्थिक गर्तेत सापडले आहेत़ मासिक वेतनासाठी १४ जुलै रोजी एक दिवस सामूहिक रजेवर जात असल्याचे पत्र शाळेच्या आठ शिक्षकांनी मुख्याध्यापकांना दिले आहे़जिल्हा परिषद हायस्कूल (मुलांचे) किनवट येथील शिक्षकांचे तीन महिन्यांचे वेतन झालेच नाही़ वेतनाअभावी शिक्षकांसह त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे़ मुलांचे शैक्षणिक शुल्क, बँकेचे गृहकर्ज हप्तांचा भरणा करणे व अन्य किरकोळ खर्च करणेही कठीण बनल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ शिक्षक वर्ग वेतनाअभावी आर्थिक संकटात सापडला आहे़१० जुलैच्या अंकात लोकमतने तीन महिन्यांपासून शिक्षकांचे पगार थकले, किनवट तालक्यातील शिक्षकांचे हाल या मथळ्याखालील वृत्त प्रकाशित करत पगार न झाल्यास शिक्षक सामूहिक रजेवर जाण्याच्या मन:स्थितीत असल्याचे संकेत दिले होते़ पण शिक्षण विभागाच्या लक्षात ही बाब न आल्याने अखेर जि़प़च्या आठ शिक्षकांनी मासिक वेतनासाठी १४ जुलै रोजी सामूहिक प्रासंगिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे़ जि़ प़ नांदेड येथे जाण्यासाठी प्रासंगिक रजा मंजूर करावी, असे पत्र १२ जुलै रोजी मुख्याध्यापकांना दिले आहे़ शिक्षकांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे़ थकीत वेतन त्वरित मिळावे अशी शिक्षकांची मागणी आहे़ (वार्ताहर)
शिक्षकांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले
By admin | Updated: July 14, 2014 01:02 IST