दौलताबाद : येथून काही अंतरावर असलेल्या टाकळीवाडीत (ता. गंगापूर) अठरा वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे बुधवारी समोर आले आहे. विहिरीत उडी मारून तिने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांकडून सांगितले जात असले, तरी तरूणीच्या वडिलांनी तिला खड्डा खोदून कुणालाही काही न सांगता पुरल्याने ही आत्महत्या की घातपात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलीस तपास करत आहेत. राधा कैलास जारवाल (१८) असे मयत तरूणीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मयत राधा जारवाल हिने सोमवारी (दि.२०) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आईशी घरगुती कारणावरून वाद घातला. सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वडील कैलास जारवाल घरी आले असता, राधाच्या आईने वडिलांकडे तिची तक्रार केली. तेव्हा वडिलांनी राधाला सरपणातील काठीने मारहाण केली. त्याचा राग अनावर झाल्याने राधाने घरातून पळ काढत शेताच्या दिशेने धाव घेतली व काही समजण्याआधीच विहिरीत उडी मारली. दरम्यान, वडील कैलास जारवाल हे पाठीमागून धावत गेले, तेव्हा मुलीने विहिरीत उडी मारल्याचे त्यांच्या लक्षात आले.
वडिलांनी शेजारी राहणारे धनसिंग जारवाल (मोठे काका), रामसिंग जनगले (चुलत मामा) यांच्या मदतीने मुलीला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर घराजवळील गोठ्यातील खाटेवर ठेवले. सकाळी अंत्यविधी करू, असे तिघांनी ठरवले आणि तिघेही घराकडे निघून गेले. परंतु, घडलेला हा प्रकार वडिलांनी कोणालाही न सांगता रात्री एकट्यानेच मुलीला उचलून स्वत:च्या शेतातील विहिरीलगत खड्डा खोदून पुरून टाकले. दरम्यान, मंगळवारी या घटनेची कुणकूण नातेवाईक व गावकऱ्यांना लागली. पोलीस पाटील उदयसिंग जारवाल यांनी कुटुंबीयांची चौकशी केली. पण कोणीही काही सांगण्यास तयार नव्हते. अखेर बुधवारी दुपारी पोलीस पाटील यांनी दौलताबाद पोलिसांना याची माहिती दिली.
-----
रात्री उशिरापर्यंत सुरू होती चौकशी
या घटनेची माहिती मिळताच दौलताबाद ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक रवी कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. राठोड, पोलीस अंमलदार सुदर्शन राजपूत, व्ही. एस. खंडागळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. ही सर्व घटना संशयास्पद असून, तरुणीची आत्महत्या की घातपात हा प्रकार तपासानंतरच समोर येणार आहे. बुधवारी रात्री उशीर झाल्याने तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला नव्हता. रात्री उशिरापर्यंत दौलताबाद पोलीस ठाण्यात वडील कैलास जारवाल व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू होती.