औरंगाबाद : घाटीतील वैद्यकीय घनकचरा नियमांकडे डोळेझाक करून मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला फेकला जात आहे. त्यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली. या प्रकाराची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी या जागेची पाहणी केली. यावेळी आढळलेल्या गंभीर बाबी वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात येणार असून, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची सक्त सूचना घाटी प्रशासनास करण्यात आली आहे.घाटी रुग्णालयातील वैद्यकीय घनकचरा (बायोमेडिकल वेस्ट) नियमांकडे डोळेझाक करून मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला टाकला जात आहे. वैद्यकीय घनकचरा सर्रास काळ्या पिशव्यांमध्ये संकलित करून या ठिकाणी फेकण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला. यामुळे या विभागातील रुग्णांना आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय याचा सर्वाधिक धोका दररोज कचरा गोळा करून याठिकाणी फेकणाऱ्या कर्मचाऱ्यांना आहे. अनेक कर्मचाऱ्यांकडे कचरा गोळा करताना आणि फेकताना हातमोजे, मास्क आणि बूट नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वैद्यकीय घनकचऱ्याच्या हाताळणीतून कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. घाटीत वॉटर ग्रेस कंपनीकडून पिवळ्या, लाल पिशव्यांमध्ये जमा झालेला वैद्यकीय घनकचरा संकलित केला जातो. परंतु काळ्या पिशव्यांमध्ये गोळा केलेला वैद्यकीय घनकचरा संकलित केला जात नाही. अशा परिस्थितीत मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाजवळ ओला-सुका कचऱ्यासह वैद्यकीय घनकचऱ्याचेही ढीग उघड्यावर पडल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ने समोर आणली.
घाटीत प्रदूषण नियंत्रणकडून पाहणी
By admin | Updated: October 10, 2016 01:12 IST