नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत बांधण्यात आलेले घरकुल व मूलभूत सुविधांच्या कामाची पाहणी शनिवारी केंद्रीय समितीच्या पथकाने केली़ राज्यातील इतर शहराच्या तुलनेत नांदेड शहराच्या कामाबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले़ शहरात एकूण २७ हजार ९८५ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट आहे़ १३ हजार घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०१५ पर्यंत ६ हजार ६३९ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान मनपासमोर आहे़ झोपडपट्टीमुक्त शहराच्या निर्मितीसाठी गोरगरिबांना राहण्यासाठी पक्के घरे देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प शहरातील १६८ भागात राबविण्यात येत आहे़ मागील तीन वर्षांपासून ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवली जात आहे़ अनेक अडथळ्यांची मालिका पूर्ण करीत योजना उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे वाटचाल करीत आहे़ त्यापैकी सध्या १३ हजार घरकुले बांधून पूर्ण झाले आहेत़ तर १६ हजार २१० घरकुलांना मार्कआऊट दिले आहे़ २ हजार ५० लाभार्थी स्वत: बांधकाम करत असून त्यापैकी १ हजार १५० घरे पूर्ण झाले आहेत़ या कामांची केंद्रीय पथकाकडून वेळोवेळी मूल्यमापन झाले आहे़ त्यानुसार निधीचे वाटप करण्यात आले़ ही योजना आता अंतिम टप्प्यात आहे़ उत्तर नांदेड भागातील डीपीआर १० मधील घरकुलांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी समितीचे दोन सदस्य शनिवारी नांदेडात आले होते़ तरोडा खु़ व तरोडा बु़ तसेच रामनगर, सांगवी भागातील गौतमनगर या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली़ घरकुलांच्या सुरू असलेल्या कामांची तसेच पूर्ण झालेल्या घरकुलांची पाहणी करून पथकाने समाधान व्यक्त केले़ यासंदर्भात लोकमतशी बोलताना समितीचे सदस्य मुरलीधर कृष्णन म्हणाले, राज्यात जेएनएनयुआरएम व बीाएसयुपी योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांचे मूल्यमापन करण्यात येत आहे़ नांदेड शहरातील बीएसयुपी योजनच्या घरकुलांच्या कामांची आज पाहणी करण्यात आली़ यावेळी लाभार्थ्यांनी घरकुल बांधणीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे़ घरकुलांची कामे प्रथमावस्थेत आहेत़ या कामांचा दर्जा उत्तम असून पूर्ण झालेल्या घरकुलांची स्थिती समाधानकारक आहे़ विशेषत: प्रस्तावित रचनेनुसारच घरकुलांची उभारणी करण्यात आली आहे़ परंतु लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून आले़ घरकुलांच्या परिसरात अस्वच्छता आढळून आली़ गौतमनगर भागातील काही इमारतीतील सुविधांची दुरवस्था झाली असून त्या ठिकाणी देखभालीची गरज आहे़ त्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या परिसरातील सुविधांचे रक्षण करणे गरजेचे आहे़ त्यासाठी महापालिकेच्या वतीने लाभार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे़ यावेळी मनपाचे बीएसयुपीचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता प्रकाश कांबळे, उपअभियंता विश्वनाथ स्वामी, ठाणेदार यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
घरकुलांची समितीकडून पाहणी
By admin | Updated: September 28, 2014 00:09 IST