छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विभागाच्या मंत्रिमंडळीय समितीने गुरुवारी रेल्वे मंत्रालयाच्या एकूण सुमारे ११ हजार १६९ कोटी रुपये गुंतवणुकीच्या ४ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यात छत्रपती संभाजीनगर-परभणी या १७७ किमी अंतराच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा समावेश आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर-अंकाई (मनमाड) या ९८ किमी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. आधी मुंबई आणि नंतर परभणीचा रेल्वेचा प्रवास ‘डबल ट्रॅक’ने होईल.
पीएम गतिशक्तीअंतर्गत मार्च महिन्यात आयोजित ८८व्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या (एनपीजी) बैठकीत देशभरातील महामार्ग, रेल्वे, माहिती तंत्रज्ञान आणि मेट्रो अशा ११ पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश होता. त्यानंतर अवघ्या चारच महिन्यांनी गुरुवारी या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवी झेंडी दाखवली.
सपाटीकरण, पुलांचे काम सुरूछत्रपती संभाजीनगर-अंकाई या दुहेरीकरणासाठी सपाटीकरणाचे काम जोरात सुरू आहे. छोट्या-मोठ्या अनेक पुलांचीही कामे सुरू आहेत. जून २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य दक्षिण मध्य रेल्वेने ठेवले आहे. मुंबईचा प्रवास करताना आजघडीला ठिकठिकाणी दुहेरीकरणाच्या कामाने वेग घेतल्याचे पाहताना प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण कधीपर्यंत?अंतर - १७७ किमीखर्च - सुमारे २,१७९ कोटीकालावधी : २०२९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
छत्रपती संभाजीनगर-अंकाई दुहेरीकरणाची स्थितीअंतर - ९८ किमीखर्च - सुमारे ८७६ कोटीकालावधी : जून २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
उद्योगाला मोठा फायदाछत्रपती संभाजीनगर-परभणी या मार्गाच्या दुहेरीकरणात २१ स्टेशन, २८ मोठे पूल, १६१ छोटे पूल आणि २९ भुयारी मार्गांचा समावेश आहे. या दुहेरीकरणामुळे ‘डीएमआयसी’ म्हणजे छत्रपती संभाजीनगरातील उद्योगाला मोठा फायदा होईल. प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. कुठेही अतिरिक्त थांबे घेण्याची गरज पडणार नाही. मालवाहतुकीला फायदा होईल.- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती
मुदतीत काम व्हावेछत्रपती संभाजीनगर-अंकाई या दुहेरीकरणाचे काम काही ठिकाणी वेगात, तर काही ठिकाणी संथ सुरू असल्याचे दिसते. हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होण्यासाठी रेल्वेने लक्ष दिले पाहिजे.- राजकुमार सोमाणी, रेल्वे प्रवासी सेना
छत्रपती संभाजीनगर-परभणी दुहेरीकरणाचा फायदा- १४.३ दशलक्ष टन अतिरिक्त माल वाहतूक.- ‘लाॅजिस्टिक’ची वर्षाला १,७१४ कोटींची बचत.-४.५ कोटी लिटर डिझेलची बचत.- ७७ कोटी कि. ग्रॅ. कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जनात घट.- ३ कोटी वृक्ष लावण्याइतका पर्यावरणीय लाभ.