हिंगोली : जिल्ह्यातील नागरिकांना उष्माघात व आगीपासून स्वत:चा बचाव करावा. उन्हाळ्यात दररोज तापमान वाढत असून उष्माघात होण्याची तसेच ठिकठिकाणी आग लागण्याची शक्यता असते. त्यास अनुसरून नागरिकांनी उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबत जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी आवाहन केले आहे.उष्माघात होवू नये म्हणून नागरिकांनी शेतीची व मजुरीची कामे जास्त वेळ उन्हात करू नयेत. जास्त कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावीत. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी, उपरणे किंवा फेटा बांधावा, पांढऱ्या रंगाचे व सैलसर कपडे वापरावेत. भरपूर पाणी प्यावे, चक्कर येणे, ताप येणे, भूक न लागणे व डोके दुखणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत अशी लक्षणे दिसातच त्वरीत वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावेत.तसेच आग लागू नये म्हणून पेटती काढी, विडी व सिगारेट इतरत्र कोठेही टाकू नयेत. घरातील चुलीतील विस्तव स्वयंपाकानंतर पूर्णपणे विझवावा तसेच चूल अथवा शेगडीजवळ ज्वालाग्रही पदार्थ ठेवू नयेत. सिलिंडरचा रेग्युलेटर काम झाल्यानंतर बंद करावा आणि त्याची वेळोवेळी तपासणी करावी, घरातील विद्युत तारा, उपकरणे याची देखरेख व तपासणी करावी तसेच घरातील विद्युत यंत्रणेवर अधिभार होवू देवू नये, यामुळे शॉटसर्कीट होवून आग लागू शकते. आणि विद्युत डी. पी. जवळ गवत, चारा, लाकडे इत्यादी तत्सम साहित्यांची साठवण करू नये, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने नागरिकांना कळविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा
By admin | Updated: April 4, 2016 00:22 IST