सिल्लोड : कोटनांद्रा (ता. सिल्लोड) येथे सोमवारी रात्री ५ मित्रांनी मिळून एकाचा खून केला. या गुन्ह्यातील संशयित आरोपीने नंतर भीतीपोटी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली. खून झालेल्या इसमाचे नाव गजानन भीमराव काकडे (३५, रा. कोटनांद्रा) असे आहे, तर गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचे नाव विलास त्र्यंबक तरळ (२९, रा. कोटनांद्रा) असे आहे.काकडे याचा खून सोमवारी रात्री झाला. कोटनांद्रा येथील एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. त्यात त्याच्या गुप्तांगावर मार लागलेला आहे. काकडे खून प्रकरणातील ५ आरोपींपैकी मुख्य आरोपी विलास तरळ याने त्याच्या शेत वस्तीवरील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार विलास तरळ याचे कोटनांद्रा येथे खताचे दुकान आहे. गजानन काकडे आणि त्याचे तीन साथीदार हे विहीर खोदकाम करतात. त्यांच्याकडे विहीर खोदण्याचे क्रे न आहे. त्यामध्ये या पाचही जणांची भागीदारी होती. सोमवारी सकाळी या पाचही जणांनी विलास तरळ याच्या खताच्या दुकानावर खताची पोती उतरवली व संध्याकाळी गावाची जत्रा असल्यामुळे या पाचही जणांनी बोरगाव येथे जाऊन एका ढाब्यावर जेवण केले. त्यातच त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर काकडे याचा खून करण्यात आला. रात्री गजानन काकडे हा घरी आला नाही म्हणून नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना गजानन याचा मृतदेह एका शेतात आढळून आला. ही माहिती मयताचा नातेवाईक कैलास रंगनाथ काकडे याने सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच सपोनि शंकर शिंदे घटनास्थळी दाखल झाले. विलास याने गळफास का घेतला. खून का करण्यात आला. त्याच्यासोबत असलेले इतर साथीदार कोण? या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. सध्या तरी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास सपोनि शंकर शिंदे करीत आहेत.गजाननचा मृतदेह पाहून त्याच्या गुप्तांगावर मारल्याचे पोलिसांना लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय मागितला आहे; परंतु गजानन याचा खूनच करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
खून करून आरोपीने केली आत्महत्या
By admin | Updated: May 11, 2016 00:50 IST