नागद : नागद सर्कलमध्ये सात ग्रामपंचायती असून त्यात पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या गावांतील बहुतांश लोक ऊसतोडणीची कामे करीत असल्याने ते गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ऊस तोडणी करण्यासाठी गेलेले आहेत. असे ऊसतोड कामगार यंदा होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून वंचित राहणार आहेत.
आधी कोरोना त्यानंतर अतिवृष्टी आली. त्यामुळे गावागावातील लोकांसमोर आर्थिक संकटे निर्माण झाली. त्यात ऊसतोड मजुरांनी गावे सोडून जेथे काम मिळेल तिथे आपले बिऱ्हाड मांडले. त्यामुळे गाव, तांडे माणसांविना ओस पडली आहेत. मात्र, जिल्हाधिकारी यांनी नुकत्याच औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यात नागद परिसराअंतर्गत सात गावे येतात. त्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, या गावातील बहुतांश लोक ऊस तोडायला गेले आहेत. जवळपास सत्तर टक्के तांडे, वाड्या, वस्त्यांरील मजूर ऊस तोडणीसाठी बाहेर गेले आहेत. त्यामुळे हे सर्व लोक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांची कामे सोडून येतील, असे स्थिती नाही. परिणामी, मनासारखा उमेदवार निवडून देता येऊ शकत नाही, याची खंत त्यांना राहणार आहे.
-------
या गावांत आहे मतदारांची नगण्य संख्या
नागद ग्रामपंचायतीमध्ये आंबेडकरनगर, प्रेमनगर, बोरमली तांडा, पांगरा तांडा, रामपुरा या गावांचा समावेश होतो. नागद तांडामध्ये ग्रामपंचायतीमध्ये भोपेवाडी, धनगरवाडी यांचा समावेश होतो. सायगव्हाणमध्ये भिलदरी तांडा, शिवतांडा, हसनावाद- बहादरपूर (तांडा), तर बेलखेडा तांडा, बेलखेडा ग्रामपंचायतीचा समावेश होतो. सोनवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. वरील ग्रामपंचायतींमधील लोक ऊसतोडणीसाठी परराज्यात गेले आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या नगण्य झाली आहे.
-----
इच्छुक करताहेत जुळवाजुळव
गावागावांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यात ऊसतोडणीसाठी गेलेले कामगार मतदानासाठी कसे येतील, यासाठी इच्छुक उमेदवार मतदारांची जुळवाजुळव करू लागले आहेत. मात्र, ते शक्य होणार नाही. शेकडो मैल दूर असलेल्या गावकऱ्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार, हे निश्चित झाले आहे. गुजरात, मध्यप्रदेशमधून गावी मतदानाला यायचे म्हटले तर किमान आठ दिवस कामावरून सुटी घ्यावी लागणार आहे. परिणामी, कामगार या मतदानाला नाकारणार, हे अंतिम सत्य आहे. त्याचा परिणाम मतदानावर होणार आहे.