औरंगाबाद : सुभेदारी विश्रामगृहातील सुमारे ७० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. अधीक्षक अभियंता ए. बी. सूर्यवंशी यांनी विश्रामगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सर्व हॅण्ड रिसिप्ट तातडीने मंडळ कार्यालयास सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. ३ आॅक्टोबर रोजी पालकमंत्री रामदास कदम यांना सुभेदारी कर्मचाऱ्यांनी घेराव घालून कामावर घेण्याची मागणी केली होती. याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करून पाठपुरावा केला. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले होते. तसेच पालकमंत्री कदम यांनी मुख्य अभियंता सुरकटवार यांना याप्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना केल्या होत्या. मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर याप्रकरणी बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण करून आंदोलन सुरू केले. सुभेदारी विश्रमागृहात ७० ते ७२ कर्मचारी आहेत. त्यापैकी केवळ १६ कायमस्वरुपी आहेत. याप्रकरणी २००५ पासून प्रस्ताव प्रलंबित आहे. सुभेदारी विश्रामगृहासाठी सुधारित आकृतिबंध सादर करावा, असे आदेश तत्कालीन सचिवांनी अधीक्षक अभियंत्यांना दिले होते. परंतु मागील ११ वर्षांपासून त्या प्रस्तावावर विचार झाला नाही. सदरील प्रस्ताव सुधारित करून शासनाकडे पाठवावा, अशी मागणी करीत सामाजिक कार्यकर्ते विजय निकाळजे यांनी ७ नोव्हेंबर रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी अधीक्षक अभियंत्यांनी हॅण्ड रिसिप्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तात्काळ मागविल्या आहेत.
‘त्या’ कर्मचाऱ्यांची रिसिप्ट कार्यालयाला सादर करा
By admin | Updated: October 29, 2016 00:50 IST