प्रतिनिधी , उस्मानाबाददहावी, बारावी किंवा अन्य परीक्षेत नापास झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. यासाठी मुलांची मानसिकता ओळखून त्यांना जीवनातील अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सक्षम बनविण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांनीच विद्यार्थ्यांना सर्व समस्यांवर तोडगा काढता येतो, हार मानू नका, याची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे मत जिल्ह्यातील मानसोपचार तज्ज्ञ व प्राचार्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. एकमेकांशी तुलना :विद्यार्थ्यांच्या या मानसिकतेबद्दल व पालकांच्या आग्रही वृत्तीबद्दल मानसोपचार तज्ज्ञ डॉ. महेश कानडे, प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर, प्राचार्या डॉ. कमलादेवी आवटे, प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांनी ‘लोकमत’शी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, काही विद्यार्थी टीव्हीवरील मालिका, चित्रपटातील विद्यार्थ्यांचे आदर्श जीवन पाहून त्याची स्वत:शी तुलना करतात. तसेच आपसातही एकमेकांशी तुलना करतात. अमूक विद्यार्थी हुशार आहे. त्याचे आईवडील मदत करतात, अशी तुलनाही करतात. न्यूनगंड तयार होतो:आईवडीलही मुलांना त्यांच्या बरोबरीच्या मुलांचे उदाहरण देऊन बघ त्याला कसे चांगले गुण मिळाले, वगैरे तुलना करतात. त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर विशेषत: मध्यमवर्गीय घरातील मुलांच्या मनावर विपरित परिणाम होऊन न्यूनगंड तयार होतो. त्यातच अशी मुले जर हळव्या मनाची असतील तर आत्महत्येकडे वळतात. जीवघेणी स्पर्धा :अनेकदा आपल्या शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत आईवडिलांकडे नसल्याने ते अडचणीत आलेले पाहूनही मुलांना नैराश्य येते. त्यांना बँकेकडून शैक्षणिक कर्ज मिळू शकते. त्यामुळे आई-वडिलांवर शिक्षणाचा भार येत नाही, हे समजावून सांगितले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना तसेच पालकांनाही वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेऊनच चांगले करिअर होऊ शकते असे नाही तर इतरही अनेक क्षेत्रात भरपूर पैसे कमावण्याची संधी आहे, हे बिंबविणेही गरजेचे आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा कमी होऊन मुलांच्या मनावरील ताण कमी होईल. मानसिक आजारही जडतात :अनेकदा मुलांना मानसिक आजारही जडतात. मात्र आईवडील ते मान्य करायला तयार होत नाहीत. भारतात या आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित आहे. सर्वसाधारण परिस्थितीत मुले आत्महत्येकडे वळत नाहीत. आजाराकडे दुर्लक्ष झाले तर खूपच नैराश्य येऊन ते आत्महत्येचे पाऊल उचलतात. त्यामुळे या आजारांबाबतही सामाजिक उद्बोधनाची गरज आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे. जरी मुले चुकली, तरीही त्यांना ती आपली मुले असल्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम असल्याची जाणीव पालकांनी त्यांना करून दिली पाहिजे. तसेच मुलांच्या वागणुकीत जर बदल जाणवला तर मुलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्ग शोधला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण झाले तर त्यांना नैराश्य येणार नाही व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत. दहावी, बारावीचे निकाल म्हणजेच आयुष्यात सर्व काही आहे, ही मानसिकता विद्यार्थ्यांनी बदलली पाहिजे. केवळ मेडिकल किंवा इंजिनीअरिंगला प्रवेश म्हणजेच आयुष्य घडते असे काही नाही. इतरही क्षेत्रात आपण नाव कमाऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांत काहीना काही वेगळे गुण दडलेले असतात. त्यांच्यातील हेच गुण ओळखून त्यादृष्टीने अभ्यासक्रमाची निवड केल्यास त्यात ते निश्चित यशस्वी होतील. त्यामुळे एखाद्या परीक्षेत नापास झालो, म्हणून आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारणे योग्य नाही.- डॉ. अशोकराव मोहेकरप्राचार्य, शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंबकेवळ एखाद्या ठिकाणी अपयश आले म्हणून आत्महत्या करणे म्हणजे त्या प्रश्नापासून दूर पळणे आहे. विशेषत: नापास झाल्यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन हे फार महत्त्वपूर्ण आहे. शाळा, महाविद्यालयातून याबाबत वारंवार कार्यक्रम होवून तणावाला सामोरे जाण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे याशिवाय पालक-विद्यार्थी तसेच शिक्षक-विद्यार्थी यांच्यात मनमोकळा संवाद होणेही गरजेचे आहे. पालकांनीही पाल्याची क्षमता ओळखूनच त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. - डॉ. कमलादेवी आवटेप्राचार्या, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबादसध्या शिक्षणक्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. यातूनच पालकांसह शाळादेखील विद्यार्थ्यांकडून मोठ्या अपेक्षा ठेवतात. आणि निकालानंतर या अपेक्षेचा भंग झाल्यास विद्यार्थी निराश होवून आत्महत्येसारखे मार्ग स्वीकारतात. याऐवजी त्याच्याकडून अपेक्षा ठेवतानाच त्याला अपेक्षित यश नाही मिळाले तरी इतर अनेक संधीही उपलब्ध आहेत, याबाबतचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. यासाठी शाळा-महाविद्यालयांनी विशेष व्याख्यानांचे आयोजन करावे. तसेच पालकांनी व नातेवाईकांनीही अशा विद्यार्थ्यांना धीर दिला पाहिजे. - डॉ. महेश कानडेमानसोपचार तज्ज्ञ, उस्मानाबादपालकांनी विद्यार्थ्यांकडे केवळ अभ्यासाचा आग्रह न धरता त्यांना मनोरंजनासाठीही वेळ देणे आवश्यक आहे. पालक तसेच शिक्षकांनीही प्रत्येक समस्येवर तोडगा आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांमध्ये अडचणींवर मात करण्याची शक्ती निर्माण होऊन ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत. तसेच आई-वडिलांनीही आपल्या मुलाची अन्य मुलांशी तुलना करणे टाळावे. कारण यामुळे मुलांना अपयश आल्यास ते खचून जातात व नैराश्यापोटी आत्महत्येसारखा मार्ग शोधतात.डॉ. दीपा सावळे, प्राचार्या, रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा
विद्यार्थ्यांनो हार मानू नका, तोडगा निघू शकतो
By admin | Updated: June 12, 2014 01:38 IST