लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांसाठी शनिवारी मुस्लिम नुमार्इंदा कौन्सिलतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. भरपावसातही धरणे आंदोलनास तरुणांनी अलोट गर्दी केली होती. कौन्सिलच्या एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले.देशातील विविध राज्यांमध्ये मुस्लिमांवर हल्ले वाढले आहेत. काही ठिकाणी निष्पाप व्यक्तींना ठारही मारण्यात आले आहे. हिंदुत्वाच्या नावावर अल्पसंख्याक समाजावर अन्याय आणि अत्याचारात वाढ झाली आहे. विशेषत: उत्तर प्रदेशात मागील काही दिवसांमध्ये अशा घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. मानवी हक्कांचे सरळसरळ उल्लंघन करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यात येत असतानाही योगी सरकार काहीच ठोस उपाययोजना करायला तयार नाही. आतापर्यंत ज्या तरुणांची हत्या झाली आहे, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला देण्यात यावा, यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.दुपारी २ वाजता भरपावसातही धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. तब्बल दोन तास धरणे आंदोलन सुरू होते. यावेळी आ. इम्तियाज जलील, जियाओद्दीन सिद्दीकी, अवेस अहेमद, सलीम सिद्दीकी, मुन्तजीबोद्दीन शेख, मेहराज सिद्दीकी, खवी फलाही, मन्नान खान, कामरान अली खान, खिजर पटेल, मौलाना अन्वर इशाती, ताहेर हुसैनी, अब्दुल रहेमान नदवी, विरोधीपक्षनेता फेराज खान, नगरसेवक अब्दुल नवीद, सय्यद अजीम, नासेर सिद्दीकी, अय्युब खान, समद यार खान यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यानंतर जियाओद्दीन सिद्दीकी यांच्या उपस्थितीत जे तरुण मरण पावले त्यांची नमाज-ए-जनाजा (अदृश्य पद्धती) पढण्यात आली.
मुस्लिम नुमार्इंदा कौन्सिलची जोरदार निदर्शने
By admin | Updated: July 2, 2017 00:44 IST