गंगापूर : भरकटलेले साधारणत: ६ महिन्यांचे बिबट्याचे पिल्लू कुत्र्याच्या भुंकण्याने मालुंजा खू. शिवारातील एका झाडावर चढले. शुक्रवारी(दि.१७)सकाळी घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महसूलसह पोलिसांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर बिबट्याला जेरबंद केले. यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी उर्वरित नर व मादी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
मालुंजा खू. शिवारात शेतकरी गजानन परसराम साळुंके यांच्या गट क्र. ३६ मध्ये शुक्रवारी भल्या पहाटे कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता; मात्र साळुंके कुटुंबीयांनी याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, सकाळी ७ वाजेच्या सुमारात त्यांची १३ वर्षीय मुलगी तेजश्री शाळेत जात असताना तिला बिबट्या त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर चढलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर गजानन यांनी ग्रामस्थांना याची माहिती दिली.
ही वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी साळुंके यांच्या शेताकडे धाव घेतली. सरपंच जगदीश साळुंके यांनी शिल्लेगाव पोलिस, वनविभाग व महसूल प्रशासनाला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर वैजापूरचे वनपरिमंडळ अधिकारी अनिल पाटील, वनरक्षक नारायण चाथे, पोशि. दिलीप सूर्यवंशी, कौतिकराव सुरडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्याच्या पिल्लासह परिसरात लपलेल्या मादी व नर बिबट्याचा शोध घेऊन सर्वांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. वातावरण तणावपूर्ण झाल्याने व ग्रामस्थ ऐकण्याचे मनस्थितीत नसल्याने नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांनी तलाठी आफरीन शेख, महसूल कर्मचारी सर्वेश भाले, प्रताप राजपूत यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन आक्रमक ग्रामस्थांची समजूत घातली. दरम्यान, दुपारी एक वाजेच्या दरम्यान वनविभागाचा पिंजरा घटनास्थळी दाखल झाला व कर्मचाऱ्यांनी झाडावर चढलेल्या बिबट्याच्या पिल्लाला जेरबंद केले. परिसरात असलेल्या नर व मादी बिबट्याचा देखील लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
महिला,मजूर, शेतकरी धास्तावलेबिबट्या आढळेल्या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये महिला काम करीत होत्या. तसेच या भागांमध्ये कापूस वेचणीसाठी आणि ऊस तोडणीसाठी बाहेरगावचे मजूर कुटुंबीयांसह उघड्यावर पाल टाकून वास्तव्यास आहेत. दिवसा ढवळ्या बिबट्या आढळून आल्याने या मजुरांसह शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत. ते आता शेतात जाण्यास घाबरत आहेत.