सिल्लोड : एका व्यापाऱ्याला मोबाइलवर बोलणे चांगलेच महागात पडले आहे. या व्यापाऱ्याची नजर चुकवून दुचाकीला लटकवलेली अडीच लाख रुपये रक्कम असलेली बॅग चोरट्याने लंपास करून तो पसार झाला. ही घटना गुरुवारी (दि.५) दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील सराफा मार्केटमधील कॅनरा बँकेसमोर घडली. या घटनेने व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील बलदेव कृषी सेवा केंद्राच्या मालकाचा चुलत भाऊ अजय गाढेकर (रा. वरुडपिंप्री, ता. सिल्लोड) हे शहरातील कॅनरा बँकेत पैसे काढण्यासाठी गुरुवारी (दि.५) दुपारी १ वाजेच्या सुमारास गेले होते. बँकेतून २ लाख ५९ हजार रुपये काढून ९ हजार खिशात तर २ लाख ५० हजार रुपये बॅगेत ठेवून ते बँकेबाहेर आले. त्यानंतर त्यांनी पैशांची बॅग दुचाकीला लटकवली. याचवेळी त्यांना एका व्यक्तीचा मोबाइलवर कॉल आला. मोबाइलवर बोलत असताना त्यांची नजर चुकवून पाळत ठेवलेल्या एका अज्ञात चोरट्याने दुचाकीला लटकवलेली पैशांची बॅग घेऊन धूम ठोकली. काही वेळाने आपली बॅग चोरट्याने लंपास केल्याची बाब लक्षात येताच गाढेकर यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खातरजमा केली. याप्रकरणी गाढेकर यांच्य तक्रारीवरून गुरुवारी पहाटे २ वाजता सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदघटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमरे तपासले असता त्यात चोरटा कैद झाल्याचे दिसून आले. त्याचे फुटेज घेऊन पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.
३ दिवसांतील दुसरी घटनापैशांची बॅग घेऊन चोरट्यांची पसार होण्याची ही ३ दिवसांतील शहरातील दुसरी घटना आहे. मंगळवारी (दि.३) दुपारी चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) येथील नीलेश जैस्वाल शहरातील डॉ. आंबेडकर चौकात कार लावून मित्रांसोबत चहा पिण्यासाठी गेले होते. याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून २ लाख ५९ रुपये घेऊन पसार झाले होते. त्यानंतर गुरुवारी ही घटना घडली. भरदिवसा लुटण्याच्या घटना घडत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.