लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी: तालुक्यातील मरडसगाव येथील वाळू धक्क्याची अनामत रक्कमच भरली गेली नसल्याने वाळू घाट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आले आहेत. मरडसगाव येथील गोदावरी नदीपात्रातील वाळूचा ठेका माजलगाव येथील शेख नाजीमोद्दीन शेख आजोमोद्दीन यांना सुटला आहे. वाळू घाटाचा लिलाव झाल्यानंतर अटी आणि शर्थीचे पालन न करताच मार्च महिन्यातच महसूल यंत्रणेकडून वाळू उपशासाठी संंबंधित ठेकेदाराला अधिकृतरित्या ताबा देण्यात आला. त्यानंतर या ठिकाणाहून वाळूचे उत्खनन सुरू झाले. मात्र वाळू लिलावात संंबंधित ठेकेदार यांनी अनामत रक्कम ३ लाख ४९ रुपये भरणा केली नसल्याची बाब समोर आली़ त्यामुळे रक्कम तातडीने भरणा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून १ जून रोजी संबंधित ठेकेदारांना आदेश काढण्यात आले. रक्कम भरेपर्यंत या ठेक्यावरून वाळू उत्खनन बंद करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहेत. हा वाळू ठेका वाळू उत्खननास २ जूनपासून बंद केला आहे, असे असतानाही या वाळू घाटातून उपसा सुरूच आहे. या संदर्भात ८ जून रोजी सायंकाळी पाच वाजता घाटातून वाळू उपसा होत असल्याची मंडळ अधिकारी प्रकाश गोवंदे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी चौकशीसाठी जात असल्याचे सांगितले. दरम्यान, यापूर्वी बेकायदा आणि नियमबाह्यवाळू उत्खनन केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात काही ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
अनामत न भरल्याने वाळू ठेका बंद
By admin | Updated: June 9, 2017 23:54 IST