गोविंद मुदखेडकर, हिंगोलीराज्यातील एस. टी. महामंडाळाचे सर्व आगार व बसस्थाकांमध्ये स्वच्छता अभियान राबवून १ मेपर्यंत कालबद्ध पद्धतीने स्वच्छ करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच राज्यातील सर्व आगार व बसस्थानके आता आपल्याला स्वच्छ झालेली दिसणार आहेत.राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत प्रादेशिक व्यवस्थापक, विभाग नियंत्रक व विभागीय अभियंता तसेच सर्व खातेप्रमुखांची नुकतीच बैठक झाली. त्यात हे आदेश दिले. शिवाय मोहीम सुरू होण्यापूर्वीचे व स्वच्छता झाल्यानंतरचे छायाचित्रीकरण संबंधित आगाराने मध्यवर्ती कार्यालयास पाठविण्यासंबंधी सूचित केले आहे. स्वच्छता अभियानांतर्गत बसस्थानके, आगार, प्रसाधनगृहे, वाहनतळ, चालक, वाहकांचे विश्रांतीगृह या आस्थापना संपूर्ण स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मोहिमेदरम्यान बसस्थानकावर प्रत्येक फलाटावर किमान एक व बसस्थानक परिसरात तसेच विशेषत: महिला प्रसाधनगृहामध्ये कचरापेटी ठेवणे, आगार व कार्यशाळा परिसर स्वच्छ करताना सर्व मेंटनन्स रॅम्प, स्टोअर रूम, इंधन रूम, कार्यालयीन कक्ष, यांत्रिकी विश्रामगृह, आगार कर्मचाऱ्यांची स्वच्छतागृहे, विश्रांतीगृह, महिला विश्रामगृह आदी परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच आगार व्यवस्थापक, बसस्थानक प्रमुख, कार्यशाळा अधीक्षक यांना आगार, बसस्थानक, फलाट, परिसर, स्वच्छतागृह व चालकवाहक विश्रांतीगृह यांची स्वच्छता दिवसभरातून दर दोन तासांनी करून घेण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी स्वच्छता पाहणी केल्यानंतर स्वच्छतेबाबत ठेवलेल्या नोंदवहीमध्ये दिनांक व वेळेसहीत स्वाक्षरी करण्याच्या सूचना परिपत्रकात केल्या आहेत.१ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन असून ही मोहीम त्या दिवसापासून राबविण्यात येत आहे. यात बसस्थानकावर रांगोळ्या काढाव्यात, शोभेच्या फूलझाडांच्या कुंड्या ठेवून स्थानकाचे सुशोभिकरण करण्यासही सांगितले आहे. स्वच्छता पूर्ण झाल्याचा अहवाल ३० एप्रिल रोजी सर्व विभागांनी वाहतूक खाते मध्यवर्ती कार्यालयास विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय अभियंता व विभाग नियंत्रक यांच्या स्वाक्षरीने ई-मेलद्वारे दाखल करावयाचा आहे.यापुढे अस्वच्छता आढळल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुख यांना जवाबदार धरून त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. मोहिमेबाबत विभागीय वाहतूक अधिकारी (सामान्य) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून सर्व प्रदेश, विभाग व प्रवाशांकडून येणारे ई-मेल तपासून त्यांना कारवाईचे अधिकार दिले आहेत.
राज्यभर आगार, बसस्थानके होणार चकाचक
By admin | Updated: April 26, 2016 23:44 IST