आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील जगदंबा आजूबाई यात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त मंगळवारी पहाटे ४ वाजता जगदंबा आजुबाई देवीची स्वारी निघणार आहे.आन्वा येथील आजुबाई संस्थानच्या वतीने दरवर्षी यात्रा भरते. यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक आदी राज्यातील सदगुरु लक्ष्मीकांत महाराजांचे शिष्य या ठिकाणी दर्शनासाठी येतात. अष्टमीच्या रात्रीपासून स्वारीचा कार्यक्रम सुरू होतो. रामनवमीच्या पहाटे चार वाजेनंतर जगदंबा आजुबाईची स्वारी कार्यक्रम पार पडतो. स्वारीचा मान मागील १३ वर्षांपासून प.पू. सोनू महाराज यांना मिळालेला आहे. यापूर्वी १९६२ पासून सद्गुरू लक्ष्मीकांत महाराज स्वारी घेत होते. अष्टमीस सकाळी प.पू. सोनू महाराजांना सुवासिनी व ब्राह्मण मंत्रघोषात मंगलस्रान घालतात. नंतर प.पू. सोनू महाराज आजूबाईच्या मंदिरात ध्यानस्त होतात. रात्री १२ वाजेच्या सुमारास गावातील मंदिरात भगवतीची आज्ञा घेतात. गावातील मंदिर हे आजूबाईचे जन्मस्थान आहे. आज्ञा घेतल्यानंतर ते आजूबाईचे वस्त्र परिधान करतात. आजूबाईला आरसा दाखवून स्वरूप दर्शन घडविले जाते. यानंतर स्वारी निघते. तोपर्यंत स्वारीस्थान ते गावातील मंदिरापर्यंत गोंधळ निघतो. पोता उजळतात. भक्तगण नवसाच्या पोता कबूल करतात व पोता खेळतात. हजारोंच्या संख्येने पोतांचा प्रकाश पसरतो. यात्रेनिमित्त गावात प्रसादाचे स्टॉल, विविध खेळण्यांची दुकाने थाटली जातात. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानकडून व ग्रामंपचायत कार्यालयाकडून पाणी पुरवठ्याची खाजगी तीन टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)
आजपासून आजूबाई यात्रा उत्सवास होणार प्रारंभ
By admin | Updated: April 2, 2017 23:51 IST