संजय जाधव , पैठणशांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या गावातील मंदिरात असणाऱ्या पवित्र रांजणात शुक्रवारी (दि.२५) गोदावरीतून जल आणून भरण्यास सुरुवात करण्यात आली. तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर या पवित्र रांजणाची विधिवत पूजा केल्यानंतर भाविकांनी रांजण भरण्यास प्रारंभ केला .भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रूपात पैठणनगरीत राहत सलग १२ वर्षे नाथ महाराजांच्या वाड्यातील या पवित्र रांजणात गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरल्याची आख्यायिका आहे. हा रांजण भरण्यास प्रारंभ झाला म्हणजे नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ झाला असे मानले जाते. एकनाथ महाराज असे संत होते की भगवान श्रीकृष्णालादेखील नाथ महाराजांच्या घरी राहून नाथ महाराजांची सेवा करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली. भगवंत ‘श्रीखंड्या’चे रूप धारण करून नाथांच्या घरी प्रकट झाले. नाथ महाराजांची भेट घेऊन सेवा करण्याचा मनोदय व्यक्त करीत ‘सांगाल ते, पडेल ते काम करीन, मला सेवा करू द्या,’ अशी विनंती केली व नाथ महाराजांची परवानगी मिळविली. नाथ महाराजांच्या घरी राहून भगवंत सर्व कामे करू लागले. सडा, भांडी, स्वयंपाक, उष्टावळी , गंध उगाळणे, स्नानाचे पाणी काढून देणे, गिरिजा आईला स्वयंपाकासाठी मदत करणे, नाथ महाराज कीर्तन करीत असताना धृपद म्हणणे, कीर्तनात नाचणे...असे नानाविध कामे करीत भगवंत नाथ महाराजांसोबत सावलीसारखे वावरू लागले.आवडीने कावडीने वाहिले पाणी।एकचि काय वदावे पडिल्या कार्यात वाहिले पाणी।।द्वारकेत तपश्चर्या.......भगवंताचे पैठणनगरीत पाणी भरण्याचे कार्य सुरू असताना द्वारकेत एका भक्ताने श्रीकृष्ण दर्शनासाठी खडतर तपश्चर्या सुरू केली होती. अखेर या भक्तास दृष्टांत झाला की भगवान श्रीकृष्ण हे नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात आहेत. त्या भक्तानेपैठणला येत नाथ महाराजांना याबाबत कल्पना दिली. हे समजताच प्रत्यक्ष भगवंताकडून सेवा करून घेतल्याचे नाथ महाराजांना फार वाईट वाटले. गिरिजा आईला रडू कोसळले.लागलीच श्रीखंड्याच्या रूपातील भगवंतांचा पैठणनगरीत शोध सुरू झाला; परंतु भगवंत कोठेच सापडेना. शेवटी नाथ महाराजांनी भगवंतांचा धावा करताना माझ्या हातून काय अपराध घडला म्हणून भगवंत आपण माझ्यावर रागावलात, अशा शब्दांत भगवंतांची विनवणी केली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले व त्यांनी नाथ महाराज व द्वारकेच्या भक्तास दर्शन दिले. यावेळी नाथ महाराजांनी आपण पैठण सोडून जाऊ नये, अशी विनंती भगवंतांना केली. तेव्हा मी दरवर्षी येथे येईल असे सांगत भगवान श्रीकृष्ण तेथून निघून गेले.रांजणात भरले पाणीपैठण येथील गावातील नाथ मंदिरात पवित्र रांजण आहे. पूर्वी नाथ महाराज या मंदिरात राहत होते. नाथ महाराजांच्या या वाड्याचे रूपांतर आज मंदिरात करण्यात आले आहे. याच मंदिरात असलेल्या रांजणात भगवान श्रीकृष्णाने सलग १२ वर्षे गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरले.नाथवंशजांची गैरहजेरी खटकली आजच्या रांजण पूजेला नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी, सरदार महाराज गोसावी, हरिपंडित गोसावी व इतर नाथवंशज गैरहजर होते. यामुळे भाविकांत मोठी चर्चा झाली. याबाबत नाथवंशज हरिपंडित महाराज गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता यंदाचे सालकरी रघुनाथबुआ पालखीवाले यांनी रांजणपूजेला या असे साधे बोलावणेसुद्धा पाठविले नाही, शिवाय प्रशासनाने आमच्यावर मोठा दबाव आणला असून आम्ही तणावाखाली असल्याने इच्छा असूनही आम्ही यंदा रांजणपूजेला मुकलो. आम्ही सर्व नाथ वंशजांनी मनोभावे रांजणपूजा केली असे गोसावी यांनी सांगितले.
नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ
By admin | Updated: March 26, 2016 00:57 IST