औरंगाबाद : शहाबाजार येथील कब्रस्तानात पत्ते खेळणाऱ्या जुगाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस आल्याचे पाहून काही जुगारी पळत कब्रस्तानामागील गंध्या नाल्यात जाऊन लपून बसल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. पोलिसांच्या धाकापोटी नाल्यात लपून बसलेल्या दोनजणांची व्हिडिओ क्लीप मंगळवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाली. या कारवाईत पोलिसांनी चार जुगाऱ्यांना पकडले.
शहाबाजार येथील मलिक अंबर शाळेजवळील कब्रस्तानात सोमवारी सायंकाळी जुगारअड्डा भरल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुजमुले आणि गुन्हे शोध पथकाने कब्रस्तानच्या समोरच्या बाजूचे गेट बंद करून आत प्रवेश केला. पोलीस आल्याचे पाहून जुगारी पळू लागले. पोलिसांनी शेख इरफान शहरख गफ्फार, अविनाश रावसाहेब लांडगे, चेतन हरी देहाडे आणि संदीप अशोक दाभाडे या जुगाऱ्यांना पकडले. कब्रस्तानच्या मागील बाजूला असलेल्या नाल्याच्या दिशेने काहीजण पळून गेले. यातील दोनजण चक्क नाल्याच्या वाहत्या घाणेरड्या पाण्यात बराच वेळ बसून होते. पोलीस त्यांच्या मागे नाल्यापर्यंत गेले. पोलिसांनी त्यांना नाल्याबाहेर येण्यास सांगितले. मात्र, ते आणखी नाल्यात पुढे पुढे गेले. पोलिसांनी घाणेरड्या नाल्यात उतरून त्यांना पकडण्याचे टाळले.
नाल्यात बसल्याचा व्हिडिओ व्हायरलदोन जुगारी पोलिसांच्या धाकापोटी नाल्याच्या पाण्यात बसल्याचे पाहून नाल्याजवळील इमारतीमधील कुणीतरी रहिवाशाने त्यांची मोबाईलवर क्लीप तयार केली. ही क्लीप मंगळवारी समाज माध्यमांवर व्हायरल केली.