औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारतीत जोरदार आवाज होऊन स्पार्किंग झाल्याची घटना शनिवारी (दि.१७) दुपारी घडली. या घटनेमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांचा थरकाप उडाला होता.
घाटीत सर्जिकल इमारतीबाहेर असलेल्या विद्युत डीपीजवळ दुपारी २ वाजेच्या सुमारास जोरदार आवाज झाला. त्याचवेळी इमारतीमधील वॉर्ड-११जवळील स्वच्छता निरीक्षकाच्या कक्षाजवळ विद्युत वायरिंगमध्ये स्पार्किंग झाले. स्पार्किंगनंतर केबलने पेट घेतला. त्यामुळे भीतीने गोंधळ उडाला. सुदैवाने आग विझली. या प्रकाराने सर्जिकल इमारतीचा, बाह्यरुग्ण विभागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला. सर्जिकल इमारतीचा जनरेटरने वीजपुरवठा सुरळीत ठेवून युद्धपातळीवर देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. हा प्रकार दुपारी घडला. त्यावेळी बाह्यरुग्ण विभागात रुग्णसेवा नव्हती. त्यामुळे कोणताही परिणाम झाला नसल्याचे घाटी रुग्णालयातील विद्युत अभियंत्यांनी सांगितले.
घाटीत २२ जून रोजी प्रसूती वॉर्डातील जुन्या ‘एनआयसीयू’ स्पार्किंगची घटना घडली होती. शिवाय त्यापूर्वीही अशा स्पार्किंगच्या घटना घडल्या आहेत. सर्जिकल इमारतीत अनेक ठिकाणी जुनाट वायरिंग आहे. त्यातून अशा घटना होत आहे. इलेक्ट्रिक ऑडिट झाले. परंतु सुधारणा कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
पावसामुळे बिघाड
याविषयी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे म्हणाले, डीपीजवळील विद्युत यंत्रणेत पावसामुळे बिघाड झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे इमारतीतही स्पार्किंग झाले. कोणतीही मोठी घटना घडली नाही. जनरेटरद्वारे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला.
फोटो ओळ...
घाटी रुग्णालयातील डीपीजवळ देखभाल-दुरुस्तीचे काम करताना कर्मचारी.