हिंगोली : जिल्हा परिषदेत यंदाही समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या मुद्यावरून काही सदस्य आक्रमक होत असून ठरावीक गावांतील लोकांचीच निवड कशी होते? असा सवाल केला जात आहे. काहींनी प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत.गेल्यावर्षीही समाजकल्याण विभाग तक्रारींमुळे अडचणीत सापडला होता. खुद्द जि.प. अध्यक्षांनीच वैयक्तिक लाभाच्या योजनांची चौकशी करण्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा एका सभापतींसह काही सदस्यांनी याबाबत आक्रमक धोरणे स्वीकारले आहे. त्यामुळे यंदाही या बाबीची चर्चा सुरू झाली आहे. समितीवरील काही सदस्यांचे या निवड यादीवर प्राबल्य असून इतर सर्कलमधील लाभार्थ्यांना दरवर्षीच डावलले जात असल्याचा सदस्यांचा आरोप आहे. दुसरीकडे शिक्षण विभागाचे सदस्यही निधी खर्च होत नसल्याची ओरड करून शिक्षकांच्या बदल्यांबाबत आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. त्याचे आगामी सभेत पडसाद उमटण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत समाजकल्याणची धूसफूस
By admin | Updated: June 12, 2016 22:52 IST