लाडसावंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तीन दिवस एकाही डॉक्टर व कर्मचाऱ्याने तिकडे ढुंकूनही पाहिले नाही तसेच कर्मचारी दांडी मारत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर जि. प. अध्यक्षा मीनाताई शेळके यांनी याची दखल घेत बुधवारी या आरोग्य केंद्राला सकाळी ११ वाजता भेट दिली. यावेळी त्यांना पंधरा डॉक्टर, कर्मचाऱ्यांपैकी केवळ सहाजणच उपस्थित असल्याचे दिसले. कर्मचारी गैरहजर पाहून त्यांचा पारा खवळला व मीच आरोग्य केंद्राला टाळे ठोकते, असा इशारा दिला. यावेळी उपस्थित कर्मचारी मात्र, चांगलेच गोंधळले होते.
जि. प. अध्यक्षा मीनाताई शेळके या ‘लोकमत’चे वृत्त वाचून लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी सकाळी ११ वाजताच पोहोचल्या. तब्बल अर्धा तास त्यांनी आरोग्य केंद्राची पाहणी केली. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची विचारपूस केली. यावेळी उपकेंद्रात केवळ सहा कर्मचारी उपस्थित असल्याचे त्यांना दिसले. हजेरी पुस्तक पाहिल्यानंतर अनेक कर्मचारी आठ दिवसांपासून आरोग्य केंद्रात आले नसल्याचे आढळून आले. त्यात गैरहजर कर्मचाऱ्यांचा कोणताही रजेचा अर्ज नव्हता. औषध वाटप करणारे कर्मचारी तीन दिवस रजा टाकून आठ दिवस गायब असल्याचे दिसले. आतापर्यंत मी येथे तीनवेळा भेटी दिल्या. या भेटीदरम्यान या आरोग्य केंद्रातील कारभारात कोणताही बदल झाला नाही. कर्मचाऱ्यांना कुणाचाही धाक, दरारा राहिला नसेल तर मी स्वत: आरोग्य केंद्राला टाळे ठोकते, असा इशारा दिला. यामुळे उपस्थित कर्मचारी चांगलेच गोंधळले होते. यावेळी त्यांच्यासोबत यावेळी जि. प. सदस्या रेणुका शिंदे, पं. स. सदस्य अर्जुन शेळके, सरपंच सुदाम पवार, सुरेश शिंदे, बाळासाहेब पडूळ आदी उपस्थित होते.
चौकट
आठवडी बाजारामुळे रुग्णालयात गर्दी
बुधवारी लाडसावंगी येथील आठवडी बाजार असल्याने आरोग्य केंद्रातही गर्दी झाली होती. यावेळी दोन्ही मुख्य वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते तसेच केवळ सहाच कर्मचारी उपस्थित होते शिवाय शनिवारी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची विचारपूस केली असता, काहीच सुविधा मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर गैरहजर कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फोटो : लाडसावंगी आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया झालेल्या महिलाची विचारपूस करताना जि. प. अध्यक्षा मीनाताई शेळके, सदस्या रेणुका शिंदे, सरपंच सुदाम पवार, सुरेश शिंदे, बाळासाहेब पडूळ आदी.